मुंबई : हिंदी चित्रपटविश्वात आघाडीच्या अभिनेत्रींचा उल्लेख झाल्यावर काही नावांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अर्थात त्याचा आता  नव्याने उल्लेख नको. अशाच अभिनेत्रींमध्ये शारीरिक सुदृढता आणि फिटनेस यांमध्ये अग्रस्थानी कोणत्या अभिनेत्रीचं नाव येतं असा प्रश्न केल्यास लगेचच डोळ्यांसमोर येणारं नाव म्हणजे दिशा पटनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी', या चित्रपटाच्या माध्यमातून, दिशाने बलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, त्याआधी ती 'लोफर' या तेलुगू चित्रपटातून झळकली होती. पुढे इतरही चित्रपटांतून तिच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली. दिशाच्या चित्रपटांतील भूमिकांप्रमाणेच तिच्या ऑडिशनचा व्हिडिओसुद्धा बराच चर्चेत आहे. ज्यामध्ये एक वेगळीच दिशा पाहायला मिळत आहे. 


एखाद्या भूमिकेसाठी ज्याप्रमाणे सर्वसामान्य कलाकारांची ऑडिशन घेतली जाते, अगदी तशीच ऑडिशन दिशाने दिली होती. एका मुलाखतीत खुद्द तिनेच आपल्या सुरुवातीच्या दिवसांविषयी सांगितलं होतं. शिक्षण अर्ध्यावरच सोडून अवघेच पाचशे रुपये हाताशी घेऊन ती मुंबईत आली होती. या मायानगरीत तिने काम केलं, मेहनत केली. कुटुंबाची मदत न घेता तिने स्वत:चं वेगळं विश्व निर्माण केलं. असं म्हटलं जातं की, अवघ्या पाचशे रुपयांवर मुंबई गाठणाऱ्या या अभिनेत्रीने २०१७ मध्ये स्वत:साठी पाच कोटी रुपयांचं घर खरेदी केलं. कारकिर्दीच्या या टप्प्यावरही दिशा एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला घडवत आहे आणि बऱ्याच अंशी त्यात यशस्वीदेखील ठरत आहे. 



दिशा रुपेरी पडद्यावर येताच तिच्या रुपाने अनेकांनाच घायाळ केलं. तिचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरत आहे. सुरुवातीला टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या दिशाचं नाव आता अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं जात आहे. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणं असो किंवा मग सुट्टीसाठी नवनवीन ठिकाणांना भेट देणं असो. टायगर आणि दिशा नेहमीच एकत्र दिसतात. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रीमुळेही दिशा सध्या चर्चेत आहे.