मुंबई : 2000 साली आपल्या स्माईल आणि अॅक्टींगने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रीती झिंगयानी हिने आपल्या 7 वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली आहे. प्रीतीने गुरुवारी खार पोलीस स्थानकात एका वरिष्ठ नागरिकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रीतीने तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, तिच्या मुलाला फक्त जीवे मारण्याचीच नाही तर शिवीगाळ देखील करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री प्रीतीने पती प्रवीण डबाससह पोलीस स्थानकात जावून ही तक्रार नोंदवली आहे. आरिफ सिद्दीकीवर आपल्या मुलावर खेळतांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. 


एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार प्रीतीचा मुलगा जयवीर डबास त्याच्या आजी-आजोबांसोबत एका पार्कमध्ये खेळायला गेला होता. त्यादरम्यान मुलाचा एका दुसऱ्या मुलासोबत वाद झाला आणि त्या मुलाने जयवीरला कानाखाली मारली. त्यानंतर मुलाचे आजोबा आरिफ सिद्दीकी यांनी पार्कमध्ये जयवीरला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नोंदवण्यात आलं आहे.



बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची वहिनी श्रीमा देखील यावेळी येथे उपस्थित होती. त्यांनी सिद्दीकी यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण सिद्दीकी यांनी चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक केली.