मुंबई : आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिने कायमच तिच्या कुटुंबालाही प्राधान्य दिलं आहे. सण उत्सव असो किंवा मग एखादा गंभीर प्रसंग, प्रत्येक वेळी जान्हवी तिच्या कुटुंबासमवेत उभा राहिली आहे. यामध्ये तिला वेळोवेळी साथ मिळाली त म्हणजे धाकट्या बहिणीची अर्थातच खुशी कपूर हिची. बहिणींच्या याच नात्यातील भावनिक बंध सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहेत. निमित्त ठरत आहे ते म्हणजे जान्हवीने पोस्ट केलेला एक फोटो आणि त्यासोबत लिहिलेलं कॅप्शन. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माते- दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या या दोन्ही मुली कायमच अनेकांचं लक्ष वेधत असतात. त्यातच आता त्यांच्या नात्याती भावनिक बाजू पाहता चाहत्यांनाही या बहिणींचा हेवा वाटत आहे. एकिकडे जान्हवीने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली असतानाच खुशीने मात्र अभिनयाविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी म्हणून या कलेचं रितसर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, खुशी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी येथे रवाना झाली आहे. पुढील काही वर्षे ती येथेच शिक्षण घेणार आहे. खुशीचा हा निर्णय आणि आयुष्यातील या वळणावर शुभेच्छा म्हणून जान्हवीने एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोमध्ये जान्हवी आणि खुशी या दोघींनीही अंगावर फर अर्थात (पिसाऱ्याप्रमाणे असणारं जॅकेट घातलं आहे.) त्याचाच संदर्भ देत जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हे फर (कापड) जरी खोटं असलं तरीही आमच्यातील प्रेम मात्र तसं नाही'. 




कपूर बहिणींची ही जोडी चाहत्यांच्याही मनाचा ठाव घेत आहे. मुख्य म्हणजे आतापर्यंत या दोघींनीही बऱ्याच कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली. पण, यापुढे मात्र कलाविश्वात खुशी कपूरचा वावर तुलनेने कमीच असेल. येत्या काही वर्षांमध्ये तिच्या रुपाने कलाविश्वाला आणखी एका नव्या चेहऱ्याची आणि आशेची साथ लाभणार आहे हे खरं.