Jaya Prada: `फरार` घोषित झाल्यानंतर जया प्रदा अचानक कोर्टात पोहोचल्या; आधी ताब्यात घेतलं अन् नंतर...
फरार घोषित करण्यात आलेल्या जया प्रदा कोर्टात हजर झाल्या असता त्याला ताब्यात घेण्यात आलं. यावेळी जया प्रदा यांनी कोर्टाला आपण प्रत्येक सुनावणीसाठी स्वत: हजर राहू असं आश्वासन दिलं.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फरार घोषित केलं होतं. यानंतर सोमवारी अखेर जया प्रदा उत्तर प्रदेशातील रामपूर कोर्टात हजर झाल्या. यानंतर कोर्टाने त्यांना अटींसह जामीन मंजूर केली आहे. कोर्टाने जया प्रदा यांच्याविरोधात जारी केलेले वॉरंट मागे घेतले आहेत. सोमवारी जया प्रदा अचानक कोर्टात पोहोचल्या आणि सुनावणीदरम्यान न्यायाधीशांसमोर हजर झाल्या,
जया प्रदा यांच्याविरोधात एमपीएमएलए स्पेशल कोर्टात खटला सुरु आहे. यासंबंधी कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नव्हत्या. यामुळे अखेर कोर्टाने कठोर पाऊल उचललं असून त्यांना फरार जाहीर करत पोलिसांना त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला होता. यादरम्यान 4 मार्चला जया प्रदा आपल्या वकिलांसह अचानक रामपूरला पोहोचल्या आणि कोर्टात हजर झाल्या.
यानंतर कोर्टाने सर्वात आधी त्यांना न्यायालयीन कोठडीत घेतलं. यामुळे त्यांना काही वेळासाठी समोर उभं राहावं लागलं. कोर्टाने नंतर त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आणि 20 हजारांची रक्कम जमा करण्याचा आदेश दिला. तसंच त्यांच्या वकिलांनी कोर्टाला यापुढे प्रत्येक सुनावणीसाठी त्या व्यक्तिगतपणे हजर राहतील असं आश्वासन दिलं. आणि उपस्थित राहण्यासाठी सूट मागणारी कोणतीही याचिका केला जाणार नाही असंही आश्वासन दिलं.
2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार असलेल्या जया प्रदा यांच्यावर निवडणुकीदरम्यान आचारसंहिताचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी रामपूरच्या एमपीएमएलए स्पेशल कोर्टात सुनावणी सुरु आहे. 2019 मध्ये जया प्रदा यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी त्यांचा पराभव केला होता. 2004 आणि 2009 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर त्यांनी रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण नंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती.
आतापर्यंत आलेल्या अनेक तारखांना जया प्रदा यांनी हजेरी लावली नव्हती. कोर्टाने वारंवार समन्स जारी केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात वॉरंट आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. पण त्या कोर्टात हजर झाल्या नव्हत्या. कोर्टाने एकूण सातवेळा अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. यानंतर पोलीस अधीक्षकांना वारंवार लिहून त्यांना हजर करण्याचा आदेश देण्यात आला. पण त्यानंतरही त्या हजर झाल्या नाहीत. यानंतर आता कोर्टाने कडक कारवाई करत त्यांना फरार घोषित केलं होतं. पोलिसांनी एक पथक तयार केलं असून, 6 मार्च 2024 पर्यंत हजर करण्यास सांगितलं होतं.