मुंबई : राजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्व किंवा अशा कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या काही दिग्गजांच्या आयुष्यावर भाष्य करणारे चित्रपट साकारण्याकडे अनेकांचाच कल असतो. बायोपिकला प्रेक्षकांचीही तितकीच पसंतीही मिळते. मुळात एका बायोपिकसाठी किंवा एका व्यक्तीचं आयुष्य रुपेरी पडद्यावर रेखाटण्यासाठी तितकीच मेहनतही घ्यावी लागते. सोशल मीडियावर सध्याच्या घडीला व्हायरल होणारे फोटो पाहता याचा पुन्हा एकदा प्रत्यय येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादी व्यक्तीरेखा साकारण्यासाठी त्यांच्या देहबोलीपासून, बोलण्याचा अंदाज, राहणीमान हे सारे बारकावे टीपले जातात तेव्हा कुठे बायोपिकमध्ये अपेक्षित भूमिका उभ्या राहतात. येत्या काळात राजकीय वर्तुळात आपल्या राजकीय कारकिर्दीची छाप पाडणाऱ्या जयललिता यांच्या प्रवासावर आधारित चित्रपट साकारण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारीही सुरु झाली आहे. जयललिता यांची व्यक्तीरेखा साकारण्याची संधी मिळालेली अभिनेत्रीही त्यासाठी बरीच मेहनत घेत आहे. ती अभनेत्री म्हणजे बॉलिवूडची 'क्वीन', कंगना. 


'थलाईवी', या चित्रपटासाठी कंगनाने नुकतीच लूक टेस्ट दिल्याचं कळत आहे. तिच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो पाहूनच याविषयी माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच या लूक टेस्टसाठी कंगना लॉस एंजेलिसला रवाना झाली होती. तिचा फोटो पाहता कंगनाला श्वास घेण्यासही अडचणी आल्या असतीलच ही बाब नाकारता येत नाही. पण, कलेप्रती आणि कामाप्रती असणाऱी समर्पकताच यातून झळकत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 



रंगोली चंदेलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कंगना प्रोस्थेटीक मेकअपच्या प्रक्रियेमध्ये व्यग्र दिसत आहे. आपल्यावर मेकअपचे थर लावले जात असतानाच ती मात्र अतिशय शांत असल्याचं पाहायला मिळत आहे.