मुलांनी सुरक्षित शरीर संबंध ठेवण्याला पालकांची हरकत नसावी- कंगना राणौत
याविषयी पालकांना कळलं तेव्हा त्यांना धक्काच बसला होता,
मुंबई : 'क्वीन' म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिने कायमच विविध मुद्द्यांवर तिची मतं मांडली आहेत. कंगना ही तिच्या ठाम भूमिकांसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठीसुद्धा ओळखली जाते. नुकतच तिने एका अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा मुद्दा म्हणजे शरीरसंबंध म्हणजेच संभोग किंवा सेक्स आणि त्यावर पालकांची प्रतिक्रिया.
दिल्लीत पार पडलेल्या 'इंडिया टुडे माईंड रॉक्स' या कार्यक्रमात तिने आपले विचार ठामपणे मांडले. आपल्या शरीरसंबंधांविषयी पालकांना कळलं तेव्हा त्यांना धक्काच बसला होता, असं म्हणत कंगनाने स्वत:च्या अनुभवावरुन इतर पालकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
'शरीरसंबंधांसाठी तुमच्या मुलांचे कोणीतरी साथीदार असणं किंवा मुळा त्यांनी कोणाशीतरी सुरक्षित शरीरसंबंध ठेवणं यावर पालकांची काहीच हरकत नसली पाहिजे. शरीरसंबंध ठेवतेवेळी सुरक्षिततेचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे. यात वारंवार जोडीदार बदलणं ही बाब चांगली नाही, कारण त्याचे वाईट परिणाम होतात', असं कंगनाने तिच्या वक्तव्यातून सर्वांपुढे मांडलं.
सेक्स, संभोग या शब्दांभोवती असणारं न्यूनगंडाचं वलय ओलांडून आता त्यापुढे विचार करण्याची गरज असल्याची बाब तिच्या या वक्तव्यातून अधोरेखित होत होती. मुलांचे शरीरसंबंध असण्याला पालकांची काहीच हरकत नसावी किंबहुना सुरक्षित शरीरसंबंधांसाठी पालकांनीच मुलांना दुजोरा द्यावा, असं मत कंगनाने मांडलं.
मानवी जीवनात या गोष्टींची गरज आणि त्यांच् महत्त्व जाणत प्रत्येकाच्याच आयुष्यात सेक्स (शरीर संबंधांना) फार महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला गरज वाटेल तेव्हा शरीरसंबंध ठेवा पण, त्याच्या पूर्णपणे अधीन जाऊ नका हे मात्र तिने न विसरता सांगितलं.
सेक्स म्हणजे मानसिक आजारपण....
सध्याच्या घडीला सेक्स किंवा शरीरसंबंध म्हणजे मानसिक आजारपणाचं लक्षण झालं आहे, असं कंगना म्हणाली. ब्रह्मचारी हे त्यांच्या शरीरातील ताकद ही विविध कामांसाठी वापरत असत. त्यासाठी ते विविध तंत्रांचा वापर करत असत. पण, त्या तंत्रांशिवाय अशा भावनांवर ताबा ठेवणं कठिण असल्याची बाब तिने मांडली. अनेकदा तुम्हाला पाश्चिमात्य विचारसरणी आचरणात आणायची असते. पण, तेव्हाही धार्मिक रुढी, परंपरा, तुमच्यातील भारतीय मन या गोष्टीसुद्धा कवटाळून बसायच्या असतात. अशा वेळी मग सेक्स म्हणजे एक मानसिक आजारपण वाटू लागतो, हा विचार कंगनाने मांडला.