मुंबई : सोशल मीडियापासून अगदी राजकीय वर्तुळापर्यंत आणि कलाविश्वातही गेल्या काही दिवसांपासून बऱ्याचदा चर्चेत आलेल्या किंबहुना सातत्यानं चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री kangana ranaut  कंगना राणौत ही सध्या तिच्या कुटुंबासमवेत अतिशय महत्त्वाचा वेळ व्यतीत करत आहे. अनेक नातलगांच्या भेटीगाठीही तिला घडत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे बॉलिवूड 'क्वीन'च्या घरी सुरु असणाऱ्या लगीनघाईचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील काही दिवस ही अभिनेत्री या विवाहसोहळ्यामध्येच व्यग्र असल्याचं पाहायला मिळणार आहे. सहाजिकच नेटकरी आणि चाहत्यांनाही हिमाचल प्रदेशमधील विवाहसोहळ्याची सुरेख झलक पाहता येणार आहे. आता कंगनाच्या घरी लगीनघाई, असं म्हटल्यावर ती स्वत:च विवाहबंधनात अडकते की काय असाच प्रश्न अनेकांच्याच मनात घर करुन गेला आहे. पण, असं नाही आहे. 


हा सारा थाट आहे कंगनाच्या भावाच्या म्हणजेच अक्षतच्या विवाहसोहळ्याचा. पुढील महिन्यामध्ये तिचा भाऊ विवाहबंधनात अडकणार आहे. त्यासाठीच्या प्रथा आणि परंपर पार पाडण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. ज्यापैकीच एका विधी आहे बधाई. खुद्द कंगनानं या विधीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या भावाच्या चेहऱ्यावर हळद लावताना दिसत आहे. या क्षणी इतर कुटुंबीयांचीही उपस्थिती पाहायला मिळत आहे. 


आता हळद लावली म्हणजे हा हळदीचा विधी झाला, तर असं नाही. कंगनानं या विधीबद्दलही थोडक्यात माहिती दिली आहे. या विधीचं नाव आहे 'बधाई'. हिमाचल प्रदेश भागातील ही एक परंपरा. ज्यामध्ये लग्नाचं पहिलं निमंत्रण हे मामाच्या घरी देण्यात येतं. कंगनाच्या भावाचं लग्न पुढच्या महिन्यात असल्यामुळं याच पार्श्वभूमीवर बधाई संपन्न झाल्यानंतर आता सर्वांना लग्नाचं बोलावणं पाठवण्यात येणार आहे. 



 


तिनं सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर एक फोटोही शेअर केला. ज्यामध्ये या सोहळ्यासाठी तिचा सुरेख असा लूक पाहायला मिळाला. चोकर स्टाईल हेवी नेकलेस, भरजरी साडी अशा लूकमध्ये कंगनानं चाहत्यांची मनं जिंकली.