भारत- पाकिस्तान मुद्द्यावरुन वादात अडकलेल्या अभिनेत्रीला कंगनाचा पाठिंबा
कारण ठरत आहे ते म्हणजे....
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत ही कायमच तिच्या वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कोणत्याही बाबतीत कंगनाचं एखादं असं वक्त्य येतं ज्यामुळे एकतर चर्चा होते, किंवा मग कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकते. सध्या बी- टाऊनची ही 'क्वीन', एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. कंगनाने आपलं स्पष्ट मत मांडत एका ग्लोबल स्टारला पाठिंबा देत तिच्या स्पष्टवक्तेपणाची प्रशंसा केली आहे.
कंगनाने पाठराखण केलेली ती अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. हिंदी कलाविश्वातून प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रियांकाने कालांतराने तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. पाहता पाहता आंतरराष्ट्रीय कलाविश्वात प्रियांकाने तिचं वेगळं स्थान प्रस्थापित केलं. इतकच नव्हे, तर प्रियांका युनिसेफमध्ये सदिच्छादूत म्हणूनही एका वेगळ्या जबबादारीत दिसते. पण, तिच्या याच पदावर आता वाद निर्माण झाला आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे 'देसी गर्ल'ने भारतीय सैन्य आणि भारत सरकारचं केलेलं समर्थन.
भारतीय सैन्य़ाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचं समर्थन आणि भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या आण्विक हल्ल्याच्या धमकीचं समर्थन करणाऱ्या प्रियांकाला तिच्या या ठाम भूमिकेसाठी बऱ्याच रोषाचा सामना करावा लागला होता. त्याचविषयी कंगनाने प्रियांकाच्या समर्थनार्थ लक्षवेधी वक्तव्य केलं.
'ज्यावेळी तुम्ही एखाद्या जबाबदारीमध्ये अडकलेले असता तेव्हा तुमच्यावर सोपवण्यात आलेली अमुक एक जबाबादारी आणि भावना यांचा मेळ साधताना योग्य तो निर्णय घेणं ही सोपी बाब नव्हे. युनिसेफच्या सदिच्छादूत असतेवेळी कोणा एका राष्ट्राप्रतीच तुमची ओळख असू सीमीत शकत नाही हे खरं. पण, आपल्यापैकी कितीजण डोक्याने नव्हे तर, मनाने घेतलेल्या निर्णयाचा कौल ऐकतात?', असं वक्तव्य करत तिने प्रियांकाला साथ दिली.
'देसी गर्ल' प्रियांकाने भारतीय सैन्यदलाच्या कारवाईच्या समर्थनार्थ केलेल्या या ट्विटनंतर सर्वाधिक प्रतिक्रियांचा भरणा हा पाकिस्तानच्या वतीने आल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी प्रियांकाविरोधात आवाज उठवला होता.