मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि वाद हे समीकरण तसं फार नवं नाही. गेल्या काही दिवसांपासून या समीकरणात कंगनाच्या बहिणीचाही प्रवेश झाला आहे. बऱ्याच वादग्रस्त प्रकरणांमध्ये रंगोली चंदेल हिने कंगनाची साथ दिली आहे. किंबहुना कित्येकदा तिच्या वतीने काही लक्षवेधी वक्तव्यही केल्याचं पाहायला मिळालं आहे. रंगोली सध्याही तिच्या एका ट्विटमुळे अशाच एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधणाऱ्या रंगोलीने यावेळी अभिनेत्री तापसी पन्नू हिच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या रंगोलीने तापसीला तिच्या एका ट्विटमुळे निशाण्यावर घेतलं. कंगनाच्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या ट्रेलरची तापसीने ट्विटरच्या माध्यमातून प्रशंसा केली. सोबतच चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा असल्याचंही तिने या ट्विटमधून म्हटलं. 


रंगोलीने मात्र कंगनाच्या चित्रपटाच्या या प्रशंसेलाही वेगळंच वळण दिलं. परिणामी तापसीचा उल्लेख तिने 'सस्ती कॉपी' असा केला. तापसीचं ट्विट पाहता रंगोलीने लिहिलं, 'लक्षात घ्या काहीजण कंगनाची नक्कल करत आहेत.  पण, चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा करताना ते तिचा उल्लेखही करत नाहीत. मागच्या वेळी मी ऐकलं होतं, तेव्हा कंगनाला दुहेरी फिल्टरची गरज असल्याचं तापसी म्हणाली होती. ही अशी स्वस्तातली कॉपी होणं थांबव....', असं तिने ट्विटमध्ये लिहिलं. 



एका ट्विटमुळे सुरु झालेल्या या वादात दिग्दर्शक अनुराग कश्यप याची तापसीला साथ मिळाली. रंगोलीच्या ट्विटला उत्तर देत ती हद्द पार करत असल्याचं अनुरागने तिला खडसावून सांगितलं. या साऱ्यावर नेमकं व्यक्त कसं व्हावं, हेच आपल्याला कळत नसल्याचं म्हणत तापसी आणि कंगनाच्या एकत्र काम करण्याची बाब त्याने अधोरेखित केली. चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा केली जाते तेव्हा त्यात स्वाभाविकच सर्वांचीच प्रशंसा होते, ज्यामध्ये कंगनाचाही समावेश आहे. 



कंगनाच्या आगामी चित्रपटाच्या, म्हणजेच 'जजमेंटल है क्या'चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. ज्याची सर्व स्तरांतून प्रशंसाही झाली. पण, त्यातही सेलिब्रिटींनी कंगनाच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे रंगोलीने घेतलेली ही भूमिका आता नव्या वादाला वाव देऊन गेली आहे.