ही आमची होणारी सून, करिष्मा...; लग्न झालेलं नसतानाच जया बच्चन यांनी करुन दिलेली ओळख
मग असं काय झालं की त्यांच्या नात्यात आला दुरावा
मुंबई : साता जन्माच्या गाठी स्वर्गात बांधून आलेल्या असतात असं म्हटलं जातं. ते खरंही आहे. पण, अनेकदा काही नाती सुरुवातीला जितकी सुरेख आणि सरळमार्गी वाटतात पुढे जाऊन याच नात्यांमधीये मीठाचा खडाही पडतो. सेलिब्रिटी वर्तुळात याची अनेक उदाहरणं आहेत. यातीलच एक उदाहरण आहे बच्चन कुटुंबातलं.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध़्ये असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून जातो. जिथं बच्चन कुटुंबाची सून म्हणून ऐश्वर्या राय नव्हे, तर कोणा वेगळ्याच अभिनेत्रीची ओळख करुन दिली गेल्याचं पाहायला मिळतं.
अनेक वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ असून यामध्ये अभिनेत्री जया बच्चन या कपूर कुटुंबाशी आपलं नातं जोडलं जाण्याचा आनंद व्यक्त करताना दिसतात. इतकंच नव्हे, तर ते मोठ्या आनंदात अभिनेत्री करिष्मा कपूर हिला बच्चन कुटुंबाची होणारी सून म्हणून सर्वांशी ओळख करुन देत पुढं बोलवताना दिसतात.
अभिषेकनं त्याच्या आईवडिलांना बिग बींच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त दिलेलं हे खास गिफ्ट, असं म्हणत त्या करिष्माला इथं प्रेमानं मिठीही मारताना दिसतात. यावेळी करिष्माच्या चेहऱ्यावर असणारं स्मित तिचा आनंद व्यक्त करुन जातं. करिष्माची बच्चन कुटुंबातील ही अधिकृत एंट्री, अशा जाहीर पद्धतीनं झालेली असताना पुढं नात्यांची समीकरणं बदलली आणि सारंकाही बदललं.
का तुटलं हे नातं?
सुत्रांच्या माहितीनुसार करिष्मानं लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करु नये अशी जया बच्चन यांची इच्छा होती. पण, करिष्माला अभिनय क्षेत्र सोडायचं नव्हतं. तिथं हे नातं बिनसण्याचं आणखी एक नातं समोर येतं. ते म्हणजे अभिषेकनं 'रेफ्युजी' या चित्रपटातून कलाविश्वात सुरुवात केली, पण तो अपयशी ठरला, तर करिष्मा बऱ्यापैकी प्रसिद्धीझोतात आली होती. ही बाब करिष्माची आई, ज्येष्ठ अभिनेत्री बबिता यांना रुचली नाही ज्यामुळं हे नातं तुटलं. या नात्यात दुरावा येण्यामागं नेमकं कारण काय हे बच्चन आणि कपूर कुटुंबीयच जाणतात असं म्हणायला हरकत नाही.