मुंबई : जवळपास १८ वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांच्या नात्यात दुरावा आला. सहजीवनाचा हा प्रवास या दोघांनीही परस्पर सहमतीने इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांनाच धक्का बसला होता. पण, नात्यासाठी योग्य काय हे मात्र त्या दोघांनी ठरवलेलं होतं. घटस्फोटानंतर या दोघांचंही आयुष्य बदलून गेलं. नेमकी घटस्फोटाच्या वेळी कुटुंबात किंवा एकंदरच परिस्थिती काय होती याविषयी आता खुद्द मलायकानेच माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रेडिओ शोमध्ये अभिनेत्री करिना कपूर हिच्याशी संवाद साधत आणि तिच्या प्रश्नांना उत्तरं देत तिने याविषयीची माहिती दिली. घटस्फोट ही भारतीय समाजात एक मोठी गोष्ट मानली जाते. अशा वेळी घटस्फोट घेत असताना तुला काय सल्ले मिळाले होते? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत आपल्याला नेमके कोणकोणते सल्ले मिळाले याविषयी सांगितलं. घटस्फोटाच्या आदल्या रात्रीही तिच्या पालकांनी या साऱ्याचा पुन्हा विचार करण्याचा सल्ला तिला दिला होता. तू खरंच या निर्णयावर ठाम आहेस का? असाच प्रश्न तिला विचारला. आपण निर्णयावर ठाम असून, दुसऱ्या दिवशी तिने अरबाजसोबतच्या नात्यातून घटस्फोट होत वेगळी वाट निवडली. 


आयुष्यात जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा घटस्फोट घेणं कसं अयोग्य आहे हेच तुम्हाला सांगण्यात येतं असं तिने स्पष्ट केलं. ज्यावेळी नात्यात पुढे नेण्याजोग्या काही गोष्टीच उरत नाहीत तेव्हा ते रेटण्यात काहीच अर्थ नसतो अशी आपली भूमिका तिने स्पष्ट केली. अरबाजसोबतच्या नात्यातून वेगळं झाल्यानंतरही मलायकाचं खान कुटुंबीयांशी असणारं नातं बदललेलं नाही. किंबहुना अरबाज आजही तिचा चांगला मित्र आहे. त्याच्या विविध कौटुंबीक समारंभांनाही तिची आवर्जुन उपस्थिती असते. मलायकाच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं तर सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका आता माध्यमांसमोरही बऱ्यापैकी सहदजपणे वावरु लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात आता मलायका या नव्या नात्याची अधिकृत घोषणा करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.