मुंबई : रविवारी अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर काही तासांनीच त्याची कथित प्रेयसी मलायका अरोरा हिचा कोरोना रिपोर्टही पॉझिटीव्ह आल्याचं निदान झालं. गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातही कोरोनाचा फैलाव अतिशय झपाट्यानं होऊ लागला आहे. अगदी बच्चन कुटुंबीयांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात सेलिब्रिटी मंडळींना मोठ्या जबाबदारीनं त्यांच्या कोरोना चाचणीबाबत माहिती दिली. अगदी मलायकानंही तिची जबाबदारी पार पाडत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. पण, तरीही तिचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट सोशल मीडियावर लीक करत तो मोठ्या प्रमाणात व्हायरल केला गेला. त्याबाबच्या चर्चाही सुरु झाल्या. 


आपली बहीण आव्हानात्मक काळातून जात असतानाच तिच्याबाबत होणाऱ्या या चर्चा पाहून मलायकाची बहीण, अभिनेत्री अमृता अरोरा चांगलीच संतापली. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून तिनं हा रिपोर्ट शेअर करणाऱ्या सर्वांनाच खडे बोल सुनावले. 'सेलिब्रिटी असण्याची ही किंमत मोजावी लागतेय? हेच ते नवं नॉर्मल वगैरे का? हे खरंच ठीक वाटतंय का?', असं म्हणत आपली बहीण चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्नशील असतानाच तिला या साऱ्याचा सामना करावा लागत आहे, असं म्हणत समाजाला नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न तिनं उपस्थित केला. 






 


सोशल मीडियावर मलायकाचा रिपोर्ट पोस्ट करणं कोणाच्या फायद्याचं होतं का? असं विचारत तिनं स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिवाय तिचा रिपोर्ट लीक झालाच कसा हा महत्त्वाचा प्रश्नसुद्धा तिनं उपस्थित केला. एखाद्या रुग्णाची गोपनीयता अशी उघडकीस आणलीच कशी जाते, असं विचारत सध्या जगभरात जे काही सुरु आहे त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं आवाहन तिनं केलं आणि हा सारा किळसवाणा प्रकार कृपया थांबवा अशी आर्जवही केली.