मुंबई : भयपटांना मिळणारी लोकप्रियता नेमकी काय असते हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आतापर्यंत बॉलिवूडमध्येही अनेक भयपट साकारण्यात आले आहेत. ज्यामध्ये आता आणखी एक नाव जोडलं जाण्याची चिन्हं आहेत. नर्गिस फाख्री या चित्रपटाच्या खरंतर भयपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रागिनी एमएमएस', '१९२० इव्हिल रिटर्न्स', 'अलोन' अशा चित्रपटांना साकारणऱ्या भूषण पटेलने पुन्हा एकदा भयपटाकडेच आपला मोर्चा वळवला असून, त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे, 'अमावस'. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन 'अमावस'च्या टीझरविषयीची माहिती दिली. 


अवघ्या काही सेकंदाच्या या टीझरमधून रात्र, अमावस्या, भय, वाईट शक्ती अशा सर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. एका क्षणाला नर्गिसच्या मागून एखाद्या राक्षसाचे किंवा वेगळ्याच शक्तीचे हात येऊन तिचं तोंड दाबत असल्याचं दृश्य टीझर पाहताना दचकवून जातं. त्याशिवाय टीझरचं संगीत आणि मध्येच ऐकू येणारी किंकाळी पाहता अमावस हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, असाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 



एका वेगळ्याच रहस्यमय जगात नेणाऱ्या या चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आलं आहे. तेव्हा आता थेट सातासमुद्रापार जाऊन साकारण्यात आलेल्या अमावस या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



नर्गिस फाख्रीव्यतिरिक्त या चित्रपटात सचिन जोशी, विवियन भटेना, मोना सिंग, अली असगर यांचीही झलक पाहता येणार आहे. तेव्हा आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भीतीदायक वातावरणात नेणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकीच प्रभावी कामगिरी करतो का याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.