मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर भाष्य करणारा चित्रपट साकारला जातो, तेव्हा त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या कलाकारांना चांगलीच मेहनत घ्यावी लागते. मुळात अमुक एका व्यक्तीला रुपेरी पडद्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक मोठं आव्हान. तेच पेलण्याच्या प्रयत्नांत अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या व्यग्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारताची फुलराणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर आणि उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट साकारला जात आहे. ज्यामध्ये परिणीती मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. याच भूमिकेसाठी तिने मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. 


सोशल मीडियावर खुद्द परिणीतीनेच तिच्या सरावादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बॅडमिंटन कोर्टवर या खेळाचा एकाग्रतेने सराव करताना दिसत आहे. इतकच नव्हे तर, एका फोटोमध्ये सरावानंतर थकल्यावर तिची नेमकी काय अवस्था होते, याचाही अंदाज तिने शेअर केला आहे. 'आधी... आणि नंतर....', असं लिहित 'तू हे सगळं कसं करतेस ?', हा प्रश्न परिणीतीने सायनाला विचारला आहे. 



कुतूहलापोटी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता सायना नेमकी कोणत्या अंदाजात देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण, मुळात परिणीती ज्या जिद्दीने सायनाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहता तिच्या प्रश्नाचं उत्तर या सरावादरम्यानच तिला मिळेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.