मुंबई : एकिकडे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची नावं समोर येत असतानाच दुसरीकडे लोकप्रिय अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट हिनं अत्यंत मोठा आणि तितकाच महत्त्वाचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवरील प्रायव्हेट अकाऊंटवरुन पूजानं तिच्या वैयक्तित जीवनातील अत्यंत महत्त्वाचा काळ सर्वांपुढं मांडला आहे. हा काळ तेव्हाचा आहे, जेव्हा मद्याच्या नशेत धुंद असणाऱ्या पूजानं यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून परिस्थितीला मोठ्या धीरानं आणि संयमानं तोंड दिलं होतं. आपल्या जीवनातील आव्हानात्मक काळाबाबत सांगताना हा मुद्दा असा जाहीरपणे मांडण्यामागचं कारणंही तिनं स्पष्ट केलं आहे. 


सोशल मीडिया पोस्टमधून अतिशय संवेदनशील मुद्द्यावर भाष्य करत पूजानं लिहिलं, 'तीन वर्षे नऊ महिन्यांपासून आजपर्यंत सोबर. आणखी तीन महिने नंतर मग चार वर्षे होणार. जसं कोणी एक अगदी मोकळेपणानं मद्यप्राशन करतं, त्याचप्रमाणं मी तितक्याच मोकळेपणानं या नशेतून सावरतेय. मला वाटत होतं, की माझा प्रवास इतरांपर्यंत विशेष म्हणजे महिलांपर्यंत पोहोचवत त्या एकट्या नाहीत हे सांगावं. जर मी हे करु शकते, तर तुम्हीही ते करुच शकता'. 


एखाद्या व्यवसाबाबत खुलेपणानं बोललं असता अनेकजण याला धाडसाची बाब म्हणतात हे पाहून आपल्याला आश्चर्यच वाटतं असं म्हणत एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीक़डे गुन्हेगाराच्याच नजरेतून पाहिलं जाण्याच्या वृत्तीबाबत पूजानं तिच्या या पोस्टमधून नाराजी व्यक्त केली आहे. 


मद्यप्राशन करणं हा सर्वस्वी आपला निर्णय होता, असं सांगत तिनं लिहिलं 'दारू हेसुद्धा एक प्रकारचं ड्रगज झालं आणि ते मी निवडलेलं ड्रग होतं. दारु बहुतांश समाजात सर्वमान्य आहे याचा अर्थ असा नाही की ते ड्रग नाही. मला मागील काही वर्षांत दारू पिण्यापेक्षा दारु न पिण्यासाठी किंवा मद्यप्राशन न करण्यासाठी अनेक कारणं द्यावी लागली'. हा वैचारिकदृष्ट्या मोडकळीस आलेला समाज तेव्हाच सावरेल जेव्हा सातत्यानं कोणाबाबत पूर्वग्रह बांधणं बंद होईल असं सूचक वाक्य तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. 


 


अतिशय समर्पक अशी पोस्ट लिहित पूजानं स्वत:सोबतच मद्याच्या व्यसनापासून किंवा इतर कोणत्याही व्यसनापासून दूर जाण्याचाच विचार करणाऱ्यांच्या समस्यांना आणि मनातील भावनांनाच जणू वाट मोकळी करुन दिली. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधत आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांनीच या अभिनेत्रीला दाद देत ती हा लढा असाच सुरु ठेवेल अशी आशाही व्यक्त केली.