मुंबई : बॉलिवूड अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणीचा तपास आता सीबीआयच्या हाती गेला आहे. शुक्रवारपासूनच सीबीआयनं सदर प्रकरणीच्या तपासाची सुरुवात केली असून, आता अधिक वेगानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आता या संपूर्ण प्रकणाला एक वेगळंच आणि धक्कादायक वळण मिळाल्याचं म्हटलं जात आहे. सुरजीत सिंह राठोड यांनी Zee Newsशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतचा मृतदेह असणाऱ्या खोलीत गेल्यानंतर त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ची ही 'सॉरी बाबू' असं म्हणाली होती, असा खुलासा त्यांनी केला. जवळपास पाच मिनिटांसाठी रिया सुशांतच्या मृतदेहापाशी उभी होती. सुरजीत सिंह राठोड ही तिच व्यक्ती आहे, ज्याच्यासमवेत रिया सुशांतच्या मृतदेहाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. 


सुशांतच्या मृतदेहाचं दर्शन घेण्यासाठीच्या प्रसंगाविषयी सांगताना सुरजीत म्हणाले, '१५ जून रोजी रुग्णालयात मी उपस्थित होतो. मी जेव्हा रुग्णालयात गेलो तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. सुशांतचा कोणीही मित्रपरिवार किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती तेथे नव्हता. रिया त्या ठिकाणी तिचा भाऊ, आई आणि कोणा एका व्यक्तीसोबत आली होती. कूपर रुग्णालयाच्या मागील प्रवेशद्वारापाशी ते उभे होते. त्यानंतर मीच रियाना मृतदेह असलेल्या खोलीमध्ये नेलं. तिथे गेल्यानंतर मी सुशांतच्या चेहऱ्यावरुन चादर बाजूला केली. त्याचा चेहरा पाहून मलाच अश्रू थांबवता आले नाहीत. माझ्या शेजारीच रिया हात जोडून उभी होती'. 


सुरजीत यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, 'सुशांतच्या गळ्याभोवती असणाऱे फासाचे वळ पाहून त्यानं  आत्महत्या केली असावी असं मला वाटलं नाही. त्यानंर मी चादर त्याच्या छातीपर्यंत नेली. तेव्हा रियानं सुशांतच्या छातीवर हात ठेवत ''सॉरी बाबू'', असं म्हटलं. तिनं असं नेमकं का म्हटलं याचाच विचार मी करत आहे. 


 


सुशांतच्या मृत शरीराला पाहून रियाची ही प्रतिक्रिया सध्या अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. दरम्यान, सीबीआयच्या हाती गेलेल्या या तपासामुळं सध्या या प्रकरणी मोठे खुलासे होताना दिसत आहेत. प्रत्येक साक्षीदार आणि पुराव्याची उलटतपासणी करण्याचं सत्र सीबीआय अधिकाऱ्यांनी सुरु केलं आहे. शुक्रवारी सीबीआयच्या याच सत्राअंतर्गत सुशांतच्या घरातील आचारी (कूक) याच्यावरही प्रश्नांचा भडीमार करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.