मुंबई : 'ग्रीक गॉड' म्हणून साऱ्या विश्वात प्रसिद्ध असणारा भारतीय चेहरा म्हणजे अभिनेता हृतिक रोशन याचा. फार कमी वयातच हिंदी चित्रपटसृष्टीत नावारुपास आलेला हृतिक म्हणजे अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत. पण, याच हृतिकला एकेकाळी अशा अडचणींचा सामना करावा लागत होता, ज्याचा त्याच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला असता. पण, त्याने मोठ्या धीराने परिस्थितीचा सामना केला आणि त्यावर मातही केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिक बालपणापासूनच बोलताना मोठ्या प्रमाणात अडखळायचा. पुढे जाऊन त्याने ही बाब सर्वांसमोरही ठेवली. किंबहुना त्याने इतरांना या अडचणीतून बाहेर पडण्यास प्रोत्साहितही केलं. त्यापैकीच एक होती, चित्रपट अभिनेत्री समीरा रेड्डी. एका चॅट शो दरम्यान, हृतिकने आपल्याला कशा प्रकारे या अडचणीचा सामना करण्यासाठी मदत केली, याविषयीचा खुलासा समीराने केला. 


'अडखळत बोलण्याच्या माझ्या सवयीमुळे मला इतरांसमोर बोलण्यास प्रचंड त्रास व्हायचा. शिवाय इतर सर्वजण माझ्याविषयी काय विचार करतील याच कारणाने मी बऱ्याचदा संकोचलेले असायचे. हृतिकने हे सारंकाही पाहिलं आणि त्याने मला एक पुस्तक दिलं ज्यामुळे माझं पुरतं आयुष्यच बदलून गेलं', असं समीरा म्हणाली. 



आपल्याला देण्यात आलेल्या पुस्तकामुळे आयुष्य पुरतं बदलून गेलं, असं म्हणत आपल्यात होणाऱ्या बदलांची जाणिव झाल्याचंही समीराने स्पष्ट केलं. त्यानंतर संवादकौशल्य तज्ज्ञांकडे जात समीराने तिच्या संवादकौशल्यावर काम करण्यास सुरुवात केली. हृतिकचे आभाप मानू तितके कमीच असं म्हणत त्याने दिलेलं ते पुस्तक आजही आपल्यासोबत असल्याचा खुलासा समीराने केला.