Motherhood and Career : कलाजगताशी थेट नातं असतानाही एकाएकी खासगी आयुष्याला प्राधान्य देत या झगमगाटापासून दूर जात एका नव्या आयुष्याची सुरुवात करणारी अनेक नावं आपल्याला ठाऊक असतील. कुटुंबाला, एका वेगळ्या करिअरला प्राधान्य देत आजवर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आहे. यामध्ये अभिनेत्रींची नावं जास्त, कारणं काहीशी एकसारखीच. लग्न झालं, मुलं झाली, काळ लोटला करिअरच्य़ा संधी निघून गेल्या वगैरे वगैरे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री समीरा रेड्डीचं (Sameera reddy) नावही त्यातलंच एक. समीरानं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. तशी ही अभिनेत्री या वर्तुळामध्ये बरीच सक्रीय असून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत असते. दोन मुलांची आई असणाऱ्या समीरानं पुन्हा एकदा अशाच मुद्द्याला हात घातला आणि स्वत:चं मनही मोकळं केलं. 


मुलगा आणि मुलीसोबतचे काही फोटो समीरानं शेअर केले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, किंबहुना एक प्रश्नच उपस्थित केला. 'करिअर आणि मातृत्त्वं. आपल्याला सगळंच मिळेल का? मला आजवर अनेकदा हा प्रश्न विचारण्यात आला की, मी पुन्हा चित्रपटांच्या विश्वात का आले नाही?', असं तिनं स्पष्ट केलं. आपल्याला पुनरागमनाच्या संधी तर होत्या पण, पुरेसं धाडस झालंच नाही, आजही नाही. असं म्हणत तिनं आपल्या शब्दांवर जोर देत एक व्यक्ती या साऱ्यामध्ये समतोल कसा राखू शकेल? हा प्रश्न मांडला. 


हेसुद्धा वाचा : FD सुरु करण्याआधी पाहा कोणती बँक देतेय किती टक्के व्याज 


कसं काय जमतं?


आपल्या फॉलोअर्समधील महिला वर्गाला संबोधित तर तिनं तुम्ही हे सर्वकाही कसं निभावून नेता, तुमचे अनुभव मला सांगा असं म्हटलं. यावेळी तिनं संदर्भासाठी काही प्रश्नही मांडले. करिअरला अल्पविराम देता का?, तुम्ही घरातून काम करता का?, तुम्हाला कसली खंत आहे का? असे प्रश्न मांडताना एक पाऊल मागे आलेल्या मातांना नेमकं काय वाटतं? असा प्रश्न समीरानं स्वत:चच उदाहरण देत विचारला. 



बस्स, मग काय? तिनं विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि या अनोख्या संवादात सहभागी होण्यासाठी अनेकांनीच तिच्या पोस्टवर कमेंट करण्यास सुरुवात केली. आपल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बऱ्याच महिलांनी समीराशी संवाद साधला. तिच्या पोस्टच्या कमेंटमध्ये हे अनुभव वाचता येत आहेत.