मुंबई : 'केदारनाथ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळातच हिंदी चित्रपट वर्तुळात आपली कायमस्वरुपी जागा तयार केली. बी- टाऊनचा नवाब, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खान याची ही लेक अशी काही प्रसिद्धीझोतात आली, की तिच्या अभिनयासोबत घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सारा चर्चेत आहे ते म्हणजे दोन कारणांमुळे. एक म्हणजे तिच्यासोबत खास नातं असणाऱ्या कार्तिक आर्यन आणि तिच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटामुळे; आणि दुसरं म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी असलेल्या एका कनेक्शनमुळे. 


सारा, रजनीकांत हे नेमकं आहे तरी काय, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? सारा लवकरच रजनीकांत यांचा जावई, धनुष याच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. निमित्त आहे, 'अतरंगी रे' हा चित्रपट. नुकतंच तिच्या या चित्रपटाविषयीचा एक फोटोही प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री सारा अली खान आणि 'कोलावरी डी' फेम धनुष हे त्रिकूट दिसत आहे. 



मुख्य म्हणजे अक्षय कुमार आणि धनुष हे दोघंही रजनीकांत यांना अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्यांच्यासोबतचा त्यांचा वावरही अनेकांचं लक्ष वेधणारा ठरतो. त्यातच आता साराला या दोन अनुभवी कलाकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तिला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. 



आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाला ए.आर. रेहमानचं संगीत असणार आहे. अतिशय दमदार कलाकारांच्या साथीने लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२१ला व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.