बॉलिवूडमध्ये आणखी एका जोडीचं शुभमंगल? सप्तपदी नाही, वचनं नाहीत तरीही झाले एकमेकांचे जोडीदार
हल्ली लग्न म्हटलं की काही नव्या संकल्पनांच्या वाटा धरण्याचा निर्णय सेलिब्रिटी जोड्या घेताना दिसतात.
मुंबई : कलाजगतामध्ये लग्नाचे वारे कधी वाहू लागतील हे काही सांगता येत नाही. पण, या लग्नसराईच्या धामधुमीत आपल्या आवडत्या कलाकारांच्या संसाराची सुरुवात झाल्याचं पाहून चाहतेही आनंदी होताना दिसतात हे मात्र नाकारता येणार नाही. हल्ली लग्न म्हटलं की काही नव्या संकल्पनांच्या वाटा धरण्याचा निर्णय सेलिब्रिटी जोड्या घेताना दिसतात. असाच निर्णय एका सुपरस्टारच्या लेकिनं घेतला.
हे सुपरस्टार आहेत, कमल हासन आणि त्यांच्या लेकिचं नाव आहे श्रुती हासन. भारतीय कलाजगतामध्ये श्रुतीनं विविध भाषांत काम करण्याचा अनुभव सोबतीला घेतला आहे.
रुपेरी पडदा गाजवणारी हीच श्रुती तिच्या खासगी आयुष्याबाबत मात्र बरीच गोपनीयता पाळताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिनं शांतनू हजारिका याच्यासोबतच्या आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं.
शांतनू एक लोकप्रिय डूडल कलाकार आहे. बऱ्या दिग्गजांसोबतही त्यानं काम केलं आहे. हल्लीच त्यानं श्रुतीसोबतच्या नात्यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर श्रुतीसोबतं आपलं नातं बदललं असं त्यानं सांगितलं.
2018 पासूनची त्यांनी ओळख. पण, 2020 मध्ये त्यांनी एकत्रच राहण्याचा निर्णय़ घेतला. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात त्यांनी एकमेकांना ओळखलं. येत्या काळात श्रुतीसोबत लग्नाचा काही बेत असल्याचा प्रश्न विचारताच त्यानं आपण आधील विवाहित असल्याचा गौप्यस्फोट केला.
कोणत्याही परंपरेशिवाय आपण कसे विवाहित आहोत हेच त्यानं स्पष्ट सांगितलं. ‘त्यावेळी कोरोनाच्या महामारीनं आपल्याला अधिक धाडसी आणि लालचीची केलं. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही एकत्र राहता. आम्ही आधीच कलात्मकरित्या एकमेकांशी विवाहित आहोत’, असं म्हणत श्रुतीसोबतचं आपलं नातं किती घट्ट आहे हे शांतनूनं स्पष्ट केलं.
आम्ही दोघंही रचनात्मक असून, अशाच गोष्टी एकत्र करण्यास प्राधान्य देतो असं सांगत लग्नाचं विचाराल तर ते मात्र मला ठाऊक नाही, असं त्यानं स्पष्ट केलं. श्रुतीसोबतच्या नात्याला आपण कामापासून वेगळंच ठेवतो हा महत्त्वाचा मुद्दा त्यानं यावेळी मांडला.
श्रुती आणि शांतनूनं हल्लीच आलेल्या ‘बेस्टसेलर’ या सीरिजमध्ये काम केल होतं. सध्यातरी ही जोडी एका वेगळ्या मार्गानं आपण विवाहित असल्याचं सांगत एकत्र राहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. लग्नाची त्यांची ही परिभाषा तुम्हाला कशी वाटली ?