`हसणंही वेदनादायी`
अन् सोनालीने वेदनांना वाट मोकळी करुन दिली
मुंबई: अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या परदेशात असून ती कॅन्सर या आजारावर उपचार घेत आहे. काही महिन्यांपूर्वीच सोनालीने तिला या आजाराने ग्रासल्याची पोस्ट केली. ज्यानंतर चाहते आणि कलाविश्वातील तिच्या हितचिंतकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं.
आपल्यावर प्रेम करणाऱ्या या असंख्य जणांकडे पाहत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या प्रकृतीविषयी सर्वांना माहिती देणं सुरु ठेवलं.
एखादा लूक असो किंवा मग एखादी आठवण असो, सोनालीने प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली.
सध्याही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अशीच एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने कॅन्सरच्या उपचारादरम्यान आपल्याला नेमकं कशा प्रकारच्या वेदनांचा सामना करावा लागतो, यावरुनही पडदा उचलला आहे.
नेहमीच मोठ्या धीराने या आजाराविषयी लिहिणाऱ्या सोनालीने या पोस्टमध्ये तिच्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
काही काळापासून आपण चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस पाहिले, असं म्हणत सोनालीने एक सुरेख असा संदेश दिला. कोणत्याही गोष्टीला घाबरत राहिले तर मला लढणं अशक्य होईल. त्यामुळे आपण खंबीर असून तितकच ताकदवानही आहोत असंच ती नेहमी स्वत:ला समजावत असते.
शरीराच्या वेदना अनेकदा बळावतात असं म्हणत कधीकधी हाताच्या बोटांची आहलचाल केल्यासही असह्य वेदना होतात. मग या शारीरिक वेदना कालांतराने मानसिक वेदनांमध्ये आणि त्यानंतर भावनिक वेदनांमध्ये रुपांतरित होतात.
हे जणू एक चक्रच आहे. या दिवसांमध्ये वाईट दिवस जास्त आहेत असं म्हणत कधीकधी हसणंही वेदना देऊन जातं हे तिने सांगितलं आहे.
सोनालीने लिहिलेली ही पोस्ट म्हणजे एक प्रकारे तिच्या वेदनांचा भार काहीसा हलका करण्याचा एक मार्ग ठरु शकतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.