मुंबई: महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि त्याविरोधात सध्या सर्वत्र सुरु असणारी #MeToo ही मोहिम हेच मुद्दे सर्वत्र विविध विषयांना वाचा फोडत आहेत. कला, क्रीडा, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांचं होणारं लैंगिक शोषण आता एक सर्वव्यापी मुद्दा झाला असून, त्याविरोधात असंख्य महिलांनी पुढे येत खुलेपणाने आपल्या भूमिका मांडण्यास, संताप व्यक्त करण्यास आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यास प्राधान्य दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#MeToo  ही मोहिम सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचली. याच मोहिमेविषयी अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आपलं मत मांडलं आहे. 


'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना तिने आपली भूमिका मांडत अत्यंत महत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. 


सध्या सुरु असणारी #MeToo चळवळ, महिलांवर होणारे अत्याचार या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं. 


फक्त कलाविश्वातच नव्हे तर समाजातील प्रत्येक स्तरात हे असे प्रसंग होतच असतात, ही बाब तिने सांगितली. 


फक्त बॉलिवूडपुरताच हे सारंकाही सीमित नसून, एक वर्ग असा असतो जिथे अमुक एका व्यक्तीकडे बरीच ताकद (अधिकार) असते, तर एक वर्ग असा असतो जो त्यांच्याकडे असणाऱ्या अधिकारांचा, ताकदीचा वापर वाईट मार्गांनी करतो, असं म्हणत महिलांनी केलेल्या धाडसाबद्दल तिने दाद दिली आहे. 


'महिला या मुद्द्यावर खुलेपणाने बोलत आहेत याचा मला आनंदच आहे. पण, त्यांचं म्हणणं कितीजणांपर्यंत पोहोचत आहे, ते कितीजण ऐकत आहेत? हा मुद्दाही लक्ष देण्याजोगा आणि तितकाच महत्त्वाचा आहे', असं ती म्हणाली. 


महिलांच्या वक्तव्याचा कितपत गांभीर्याने विचार केला जातो आणि त्यावर काय कारवाई केल्या जातात हेसुद्धा तितकत महत्त्वाचं असल्याचं मत तिने मांडल. या साऱ्या प्रकरणाशी आमचा काहीच संबंध नाही असं म्हणत त्यापासून जर का अनेकजण दूर पळण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र या साऱ्याचा काहीच उपयोग नाही, त्यामुळे मी आशावादी आहे की अशा प्रसंगाचा या महिलांना सामना करावा लागणार नाही.