`इससे ज्यादा खुदा से और क्या माँगू?`
सुष्मितासाठी प्रियकराची भावनिक पोस्ट
मुंबई : कलाविश्वात काही कलाकार हे फक्त त्याच्या कलेमुळेच नव्हे, तर त्यांच्या समाजातील स्थानामुळे आणि एक व्यक्ती म्हणून त्यांच्या वर्तणुकीमुळेही ओळखले जातात. अशा कलाकारांच्या गर्दीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन हिचं.
रुपेरी पडद्यावर आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या सुष्मिता सेन हिने बऱ्याच टप्प्यांवर तिच्या कृतीतून काही आदर्श ठेवले आहेत. मुली दत्तक घेणं असो किंवा खासगी जीवनातील काही महत्त्वाचे निर्णय असो. सुष्मिताने स्वबळावर कायमच अनेकांना हेवा वाटेल अशी कामं केली आहेत. अशा या अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त प्रियकराने खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
साधारण वर्षभरापूर्वीच सुष्मिता आणि तिच्या प्रियकराच्या नात्याविषयी सर्वांनाच माहिती झाली. सुरुवातीचा काही काळ नात्याविषयी गोपनीयता पाळल्यानंतर सुष्मिता आणि तिचा प्रियकर रोमन यांनी त्यांचं नातं अतिशय सुरेखपणे चाहत्यांसमोर ठेवलं. मुळात आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या प्रियकराच्या जीवनातही सुष्मिताने एक वेगळं आणि स्वागतार्ह वळण आणलं. ज्याविषयी तिच्याप्रतीचे भाव व्यक्त करणारी एक पोस्ट त्याने लिहिली.
विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ
सुष्मिताचाच एक छायाचित्र टीपतानाचा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ज्याप्रमाणे तो उगवता सूर्य साऱ्या विश्वाला प्रकाशमान करतो, त्याचप्रमाणे तू माझं जीवन प्रकाशमान करतेस. सत्य समोर आणायलाच हवं. या खास दिवसाच्या निमित्ताने मी तुझ्याविषयी खूप काही लिहिणार होतो. पण, तुझा विचार करतो त्यावेळी मी कायमच नि:शब्द आणि अवाक् होऊन जातो. अगदी तसाच जसा तुला हे छायाचित्र काढताना पाहून झालो होतो.'
जीवनात एक चांगला पुरुष होण्यासाठीचं सारं श्रेय त्याने सुष्मिताला देत, 'अब इससे ज्यादा खुदा से और क्या माँगू, उसने तो पूरी कायनात से मुझे नवाजा है' अशी सुरेख ओळ लिहित सुष्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रोमनचा हा शायराना आणि अनोखा अंदाज सुष्मिताच्या वाढदिवसाला आणखी खास करणारा ठरला असणार, असं म्हणायला हरकत नाही.