मुघलांमुळेच भारत श्रीमंत- स्वरा भास्कर
पुन्हा झाली सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री स्वरा भास्कर कायमच विविध विषयांवर तिचं मतप्रदर्शन करत असते. ज्यामुळ कित्येकदा याच विचारांमुळे तिच्यावर अनेकजणांचा रोषही ओढावतो. सध्याही स्वराला अशाच एका प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. ज्या कारणाने ती सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.
स्वराने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक लेख शेअर केला आहे. ज्यामध्ये मुघलांमुळे भारत श्रीमंत झाल्याचं लिहिण्यात आलं आहे. मुघल साम्राज्याने देशाला लुटलं नाही, तर त्यांच्यामुळेच देश वैभवसंपन्न झाल्याचं या लेखात म्हणण्यात आलं आहे. ज्याच्याशी सहमत होत स्वराने तो लेख शेअर केला.
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने शेअर केलेल्या लेखानुसार, 'मुघल भारतात विजेत्याच्या रुपात आले होते, पण, ते कालांतराने भारतीय म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांच्यामुळे देशात व्यापार, रस्ते वाहतूक, बंदरांचा विकास झाला. त्यांच्याच कार्यकाळात भारतातील हिंदूंचा विकास झाला, ते श्रीमंत झाले. इंग्रजांच्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या येण्यानंतर या साऱ्याला उतरती कळा लागली.'
स्वराने हा लेख शेअर करताच अवघ्या काही क्षणांमध्ये नेटकऱ्यांनी तिच्यावर तोफ डागली. कोणी उपरोधिक टीका करत तिला धारेवर धरलं तर, कोणी तिची कानउघडणी केली. मुघलांनी देश लुटला, हत्या केल्या तरीही तुला असंच वाटतंय का की त्यांनी या देशाला आणखी श्रीमंत केलं? नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर स्वराने त्यांना स्पष्टीकरण देणं गरजेचं न समजता फक्त आपण एका जाणकार इतिहासकाराचा लेख शेअर केल्याचं स्पष्ट केलं. व्हॉट्स अप किंवा ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या एखाद्या मेसेजपेक्षा हे सारंकाही वेगळं असल्याची बाबही तिने अधोरेखित केली.