मुंबई : ठाम वक्तव्यांसाठी आणि परखड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्कर ही पुन्हा एकदा तिच्या अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असणारी स्वरा सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या नावाचा एक हॅशटँगही ट्रेंड होत आहे. #swara_aunty असा हा हॅशटॅग पाहता, या प्रकरणी आता स्वराच्या अडचणींमध्ये वाढही होणार आहे, कारण तिच्या नावे पोलिसांत रितसर दोन तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''NCPCRसोबतच स्वरा भास्कर नामक अभिनेत्रीविरोधात एका कार्यक्रमादरम्यान, भारतातील दक्षिण भागातील एका चार वर्षीय मुलाला उद्देशून भेदभाव आणि वर्णभेदात्मक वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्यावर तातडीने कारवाई करत 'हॉटस्टार'कडून पोस्ट करण्यात आलेले व्हिडिओ सर्व माध्यमांवरून काढण्यास सांगण्यात आलं आहे'', अशी माहिती Legal Rights Protection Forum या स्वयंसेवी संस्थेकडून देण्यात आल्याचं वृत्त डीएनएकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 


इतकंच नव्हे, तर भाजप नेते आकाश जोशी यांनीसुद्धा स्वराविरोधात तक्रार दाखल केली आहे. अवघ्या चार वर्षी मुलाला शिवीगाळ केल्याप्रकरणी फक्त स्वरालाच नव्हे, तर तिला पाठिंबा देण्याऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 




काय आहे नेमकं प्रकरण? 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये स्वरा एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना दिसत आहे. ज्यामध्ये तिने आपल्याला एक चार वर्षांचा मुलगा भेटला होता, असंही सांगितलं. त्या मुलाने आपल्याला 'आँटी' म्हटल्याचं सांगताना तिने एक शिवी देत अर्वाच्य शब्दाचा वापर केला. स्वराचं हे वक्तव्यच तिला वादाच्या भोवऱ्यात आणणारं ठरलं. त्याप्रकरणी आता तिच्यावर पुढील कारवाई काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.