दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) महाराष्ट्र सायबर सेलकडून (Maharashtra cyber cell) समन्स बजावण्यात आलं आहे. तमन्ना भाटियाला महादेव ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग अ‍ॅपच्या उपकंपनी ॲपच्या जाहिरातीसंदर्भात समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्यावर फेअरप्ले बेटिंग अ‍ॅपवर (Fairplay betting app) आयपीएल (IPL) सामने पाहण्यासाठी बेकायदेशीरपणे प्रमोशन केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमन्ना भाटियाला साक्षीदार म्हणून बोलावण्यात आलं आहे. सायबर सेलने तिला पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगितलं आहे. ब्रॉडकास्टरने केलेल्या तक्रारीनुसार, काही आयपीएल सामने अ‍ॅपवर बेकायदेशीरपणे दाखवण्यात आले. महाराष्ट्र सायबर सेलने याप्रकरणी आधीच याप्रकरणी गायक बादशाह, अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिस आणि संजय दत्तच्या मॅनेजर्सचे जबाब नोंदवले आहेत. 


काय आहे फेअरप्ले बेटिंग अ‍ॅप


फेअरप्ले हा सट्टेबाजीचा प्लॅटफॉर्म असून असून येथे विविध प्रकारचे क्रीडा आणि मनोरंजन गोष्टींवर सट्टा लावला जातो. ॲपच्या वेबसाइटनुसार, फेअरप्लेवर क्रिकेट हा सर्वात आवडता खेळ आहे, त्यानंतर फुटबॉल आणि टेनिसचा क्रमांक लागतो. वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे त्यानुसार, सर्व खेळांचे सामने फेअरप्लेवर थेट प्रक्षेपित केले जातात जेणेकरून खेळाडू "एकाच वेळी पहा आणि जिंकू शकतील".


फेअरप्ले आणि महादेव अ‍ॅपचं बेटिंग कनेक्शन


फेअरप्ले हे महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपचं उपकंपनी अॅप आहे, जे क्रिकेट, पोकर, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल कार्ड गेम आणि संधीचे खेळ यांसारख्या विविध थेट खेळांमध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी प्लॅटफॉर्म प्रदान करतं.


महादेव बेटिंग अ‍ॅप गतवर्षी चर्चेत आलं होतं, जेव्हा रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांना अ‍ॅपसाठी जाहिरात केल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून समन्स बजावण्यात आलं होतं. संयुक्त अरब अमिरातीत पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर हे अ‍ॅप चर्चेत होतं. या लग्नासाठी 200 कोटी खर्च करण्यात आले होते. हे सर्व पैसे रोख देण्यात आले होते. 


महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप दुबईतील सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल चालवत होते. हे दोघेही छत्तीसगडमधील भिलाई येथील आहेत. कंपनी नियमितपणे नवीन वेबसाइट आणि चॅट ॲप्सवर ग्रुप तयार करून नवीन ग्राहक मिळवत असे. ते अनेकदा सोशल मीडिया वर सशुल्क जाहिराती चालवत होते आणि नफा मिळविण्यासाठी लोकांना त्यांचे नंबर पाठवण्यास सांगत असत.


ईडी मागील वर्षभरापासून महादेव अ‍ॅपशी संबंधित मनी लाँड्रिंगचा तपास करत आहेत. यामध्ये छत्तीसगडमधील विविध उच्चपदस्थ राजकारणी आणि नोकरशहा यांचा सहभाग असल्याचे दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या प्रकरणात तब्बल 6 हजार कोटींचा घोटाळा असल्याची शक्यता ईडीने वर्तवली आहे.