एक नव्हे, दोन कायदेशीर नोटीस तनुश्रीपर्यंत पोहोचल्या आणि...
`भारतात अन्यायाविरोधात बंड पुकारण्यासाठी या सर्व गोष्टी सहन कराव्याच लागतात`
मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर हा प्रसंग घडला होती, असं म्हणत तिने नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावरही तिने काही आरोप केले होते.
तनुश्रीच्या या आरोपांनंतर या संपूर्ण प्रकरणाची कलाविश्वात बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर खुद्द नाना पाटेकर यांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवतच तिने आपली माफी मागावी अशी विचारणा त्या माध्यमातून केली होती.
यातील पहिली नोटीस ही अभिनेते नाना पाटेकर यांनी तर, दुसरी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पाठवल्याचं ती म्हणाली.
अत्याचारांविरोधात आवाज उठवल्याचीच ही शिक्षा आपल्याला मिळत असल्याचं तिचं म्हणणं आहे. भारतात अन्यायाविरोधात बंड पुकारण्यासाठी या सर्व गोष्टी सहन कराव्याच लागतात, असं तिचं म्हणणं आहे.
नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांची एक टीमच सोशल मीडियावर आपली बदनामी करत असल्याचंही ती म्हणाली.
दरम्यान, नानांवर आरोप करणाऱ्या तनुश्रीने आपल्या घरी काही अज्ञातांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत काही राजकीय पक्षांकडूनही धमक्या मिळत असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तनुश्रीला आता पुढे नेमकं कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.