मुंबई : कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर एक वेगळं स्थान मिळवणाऱ्या नाना पाटेकर यांच्याच नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कला विश्वात पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर  आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत त्यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या स्पर्श केल्याचं उघडकीस आणलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या खळबळजनक आरोपानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 


कलाविश्वात बऱ्याचजणांनी या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया देत महत्वाचे मुद्दे मांडले. 


आरोप प्रत्यारोपांच्या या सत्रात काहींनी तनुश्रीला पाठिंबा दिला तर काहींनी नानाची साथ दिली. 


बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र मी तनुश्रीही नाही आणि नाना पाटेकरही नाही, असं म्हणत याविषयी बोलणं टाळलं होतं. 


बच्चन यांचं हे उत्तर पाहून आता तनुश्रीने त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


'अनेकजण महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित चित्रपट साकारतात. पण, त्याच मुद्द्यांवर प्रतिक्रिया देणं मात्र टाळतात. ज्यावेळी एखाद्या चुकीच्या कृतीविरोधात उभं राहण्याची वेळ येते तेव्हा मात्र यांची उलटसुलट उत्तरं समोर येतात जी खरंच निरर्थक असतात', असं ती म्हणाली. 


दरम्यान, तनुश्रीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत नाना पाटेकर यांनी तिला कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिला होता. तेव्हा आता या सर्व प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.