बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Triptii Dimri) 'अॅनिमल' चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली असून, आज तिला साईन करण्यासाठी निर्मात्यांनी रांगा लावल्या आहेत. बॉक्स ऑफिसवर तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असून, तिचं कौतुकही केलं जात आहे. 'अॅनिमल' चित्रपटाआधी तृप्ती डिमरीच्या 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बुलबूल' (Bulbbul) चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील अभिनयासाठीही तृप्तीचं कौतुक करण्यात आलं होतं. नुकतंच एका मुलाखतीत तृप्ती डिमरीने आपल्याला अनेकांनी हा चित्रपट करु नको असा सल्ला दिला होता असा खुलासा केला. पण यानंतरही तिने चित्रपट स्विकारला आणि स्वत:ला सिद्ध केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तृप्ती डिमरीने बलात्काराच्या सीनदरम्यान दिग्दर्शक अन्विता दत्त गुप्तन सतत माफी मागत होती असा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, "तो बलात्कार सीन फारच तीव्र होता. आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा सर्व काही सहज आहे, आरामशीर होऊन जाईल असं वाटतं. पण जेव्हा तुम्ही तो क्षण जगता तेव्हा एका वेगळीच भीती वाटते. एक अभिनेता या नात्याने तुम्ही तेथून पळून जाऊ शकत नाही हे माहिती असतं".


"ते फार भीतीदायक आणि विचित्र होतं. पण मला विचित्र वाटू नये याची जबाबदारी राहुल बोसने घेतली होती, यामुळे त्याला श्रेय द्यावं लागेल. सीन संपताच तो विषय बदलायचा आणि माझ्यासह गेम खेळायचा. त्यामुळे मी सीनमध्ये नेमकं काय सुरु आहे याचा मी फार विचार करत नसे. माझी दिग्दर्शक प्रत्येक सीननंतर शेजारी येऊन बसायची आणि रडायची. ती सतत माफी मागायची आणि म्हणायची, 'मला माफ कर, माझ्यामुळे तुला या सर्व स्थितीतून जावं लागत आहे. पण हे फक्त चित्रपटासाठी आहे," असा खुलासा तृप्ती डिमरीने केला. 


पुढे तिने सांगितलं की, जेव्हा कधी मी बुलबूल चित्रपटाची कथा ऐकत असे तेव्हा माझ्यावर अंगावर काटा येत होता. "जेव्हा माझी या भूमिकेसाठी निवड झाली तेव्हा प्रत्येकाने करु नको सांगितलं होतं. कारण तेव्हा लैला मजनू रिलीज झाला होता आणि तो फार मोठा हिट नव्हता. अनेकदा माझं मन दुखावलेलं असायचं. मी नंतर पैशांसाठी शूट करु लागले. तेव्हा आयुष्य पुन्हा त्याच टप्प्यावर आल्याचं जाणवलं. नंतर मी ऑडिशन देणं सुरु केलं. त्याचवेळी बुलबूल चित्रपट माझ्या वाट्याला आला".


23 वर्षांची असताना आपली साडी नेसणारी, दागिने घालणारी स्त्री पात्र निभावण्याची इच्छा नव्हती, पण तरीही आपण ऑडिशन दिलं आणि निवड झाली असंही तिने सांगितलं. तृप्तीने सांगितलं की, "लोक मला हा चित्रपट करु नको सांगत होतं. तू थिएटर केलं आहेस, हा छोटा चित्रपट का करत आहेस? काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कर असं ते सांगत होते. नंतर मला तुझी निवड झाली असून, दिग्दर्शकाच्या भेटीला ये असं सांगण्यात आलं. जेव्हा मी दिग्दर्शकाला भेटली तेव्हा कथा ऐकताच होकार दिला".