...म्हणून विद्या बालनच्या आनंदाला उधाण
प्रत्येकाच्या आनंदाची परिभाषा वेगळी असते आणि तो आनंद शोधण्याची, मिळवण्याची धडपडही वेगळीच असते.
मुंबई : प्रत्येकाच्या आनंदाची परिभाषा वेगळी असते आणि तो आनंद शोधण्याची, मिळवण्याची धडपडही वेगळीच असते. कलाकार मंडळीही या भावनेपासून दूर नाहीत. अभिनेत्री विद्या बालन हे त्यापैकीच एक नाव. सोशल मीडियावर विद्याने केलेली एक पोस्ट पाहता सध्याच्या क्षणाला तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, हेच स्पष्ट होत आहे.
विद्याच्या आनंदास कारण की.... कोणतेही वेगळे तर्क लावण्याआधी ते कारणच आम्ही स्पष्ट करतो. खुद्द विद्यानेच या कारणाचा खुलासा केला आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर आपली अशी स्वत:ची ओळख प्रस्थापित करणाऱ्या हिलरी क्लिंटन यांची भेट घेतल्यामुळे तिच्या आनंदाने सर्वच सीमा ओलांडल्या आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या म्हणजेच इशा अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या निमित्ताने हिलरी क्लिंटन यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. त्यावेळी विद्याला त्यांची भेट घेण्याची संधी मिळाली. ज्यासाठी तिने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे मनापासून आभार मानले आहेत. स्मृती इराणी यांच्याच मदतीमुळे तिला ही भेट घेणं शक्य झालं.
'पहिल्यांदाच आपण कोणाचीतरी ओळख करुन घेण्यासाठी पुढे गेलो...' असं म्हणत तिने ही ग्रेट भेट सर्वांपर्यंत पोहोचवली. 'अनेक वादळांना तोंड देत त्यामध्ये खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व', म्हणून तिने क्लिंटन यांचा उल्लेख केला.
विद्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये हिलरी क्लिंटन यांच्यासोबत फोटोसाठी पोझ करताना तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरही दिसत आहे. अनेकांसाठीच प्रेरणास्त्रोत असणाऱ्या क्लिंटन या एक हिरोच आहेत, असं म्हणत अमेरिकेच्या राजकारणाविषयी आपल्याला सविस्तर माहिती देत राहण्याऱ्या पती सिद्धार्थचेही तिने आभार मानले.
विद्याच्या चेहऱ्यावरील आनंद आणि तिने लिहिलेलं कॅप्शन हे बरंच काही सांगून जात असून, त्या निमित्ताने तिच्या आनंदाची परिभाषा नेमकी काय आहे, हेसुद्धा सर्वांसमोर आलं आहे.
इशा अंबानीच्या प्री- वेडिंग सोहळ्यासाठी देशविदेशातून मान्यवर पाहुण्यांची हजेरी पाहायला मिळाली. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी या सोहळ्यांना येत इशा- आनंदला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. उदयपूर येथे पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूड कलाकार आणि लोकप्रियतचेच्या शिखरावर पोहोचलेली अमेरिकन गायिका बेयॉन्से हिचीही उपस्थिती पाहायला मिळाली.