मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांनीच आखलेल्या लग्नसोहळ्यांच्या बेतांचे तीनतेरा वाजले. काहींना सोहळा आवरता घ्याला लागला, तर काहींनी लग्नसमारंभांसाठी हे कोरोना संकट टळण्याची वाट पाहण्याला प्राधान्य दिलं. पण, एका अभिनेत्रीच्या बाबतीत मात्र काहीशी अनपेक्षित घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री म्हणजे यामी गौतम (yami gautam). यामीनं दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली. यामीचं होमटाऊन असणाऱ्या बिलासपूर, हिमाचल प्रदेश इथं अतिशय छोटेखानी पण तितक्याच सुरेख सोहळ्यात तिनं नव्या प्रवासाची सुरुवात केली. पण, यामीला अद्यापही आपण विवाहित आहोत यावर विश्वासच बसत नाहीये. हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत यामीनं आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला. 


खरंतर यामी आणि आदित्यचा बेत हा साखरपुड्यापर्यंतचाच होता. सध्याच्या दिवसात ते लग्न करणार नव्हते. 'उरी' या चित्रपटाच्या प्रमोशनगदरम्यान यामी आणि आदित्य यांच्यातील संवाद वाढला. पाहता पाहता त्यांचं नातं आणखी दृढ झालं आणि अखेर ही जोडी लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचली. 


यामीनंच दिलेल्या माहितीनुसार त्या दोघांनीही तूर्तास साखरपुडाच करण्याचा निर्णय घेतला होता. सध्यचा कोरोना काळ, हे दिवस पुढे जाऊ देण्याचीच ते वाट पाहणार होते. पण, साखरपुडा वगैरे आपल्या संस्कृतीचा भाग नाहीत, असं म्हणत यामीच्या आजीनं तिच्यापुढे आणि आदित्यपुढे लग्नाचाच प्रस्ताव ठेवला. त्याचवेळी तू लग्नासाठी तयार आहेस का, असा प्रश्न आदित्यनं यामीला विचारला. आदित्यच्या या प्रश्नानंतर यामीला क्षणार्धासाठी काहीच कळेनासं झालं. पण, तिनं त्याला लग्नासाठी होकार दिला आणि अखेर आदित्य-यामीनं एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. 



आताच्या घडीलाही आपलं लग्न झालं आहे ही गोष्ट पचनीच पडत नसल्याची भावना यामीने व्यक्त केली. पण, या नात्यात ती आधीपेक्षाही अधिक आनंदी आहे, ही भावनाही तिनं न विसरता व्यक्त केली आहे.