मुंबई : सेलिब्रिटींच्या भोवती असणारं चाहत्यांचं वलय हे कोणासाठी नवं नाही. अमुक एका सेलिब्रिटीच्या येण्याने होणारी गर्दी, एक झलक पाहण्यासाठीचे चाहत्यांचे प्रयत्न हे वातावरण मुळात सेलिब्रिटींसाठीसुद्धा सवयीचं. पण, याच वातावरणामध्ये अनेकदा चाहत्यांकडून काही सीमा ओलांडल्या जातात. यावेळी मात्र सेलिब्रिटी मंडळींना काही बोचऱ्या भूमिका घ्याव्या लागतात. अभिनेत्री यामी गौतम, हिला अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवासांपूर्वीच आसामला गेलेल्या यामीला गुवाहाटी विमानतळावरच अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी तिच्यावर आसामच्या संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोपही केला. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक चाहता उत्साहाच्या भरात पुढे येऊन विमानतळावरच यामीच्या गळ्यात पारंपरिक शेला (गमोसा) घालू पाहताना दिसतो. तो आपल्या दिशेने येत असल्याचं पाहताच यामीनेही त्याला धक्का दिल्याचं या व्हिडिओत दिसतं. इतकच नव्हे, तर यामीसोबत असणाऱ्यांनी त्या व्यक्तीला दूर होण्यास सांगितल्याचंही कळत आहे. 


हा सर्व प्रकार जेव्हा सोशल मीडियावर सर्वांसमोर आला तेव्हा, आसामच्या पारंपरिक कापडाचा अपमान करुन भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर काहींनी केला. आपल्याविरोधात होणाऱ्या या नकारात्मक चर्चा पाहून खुद्द यामीनेच याविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या. 


'माझी कृती ही फक्त आणि फक्त स्वसंरक्षणासाठी केली गेली होती. कोणा एका व्यक्तीच्या स्पर्शाने मला संकोच वाटत असल्यास त्याविषयी हरकत व्यक्त करण्याचा माझा आणि इतर कोणत्याही मुलीचा हक्क आहे. मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. पण, कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तणुकीविरोधात आवाज उठवला जाणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे', असं तिने ट्विट करत म्हटलं. 





पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल


आपण यापूर्वीही आसामला भेट दिल्याचं म्हणत देशाप्रती आपल्या मनात प्रेमाचीच भावना असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. शिवाय परिस्थितीविषयीची एकच बाजू पाहून त्याविषयी प्रतिक्रिया न देण्याविषयीचं मतही तिने मांडलं. यामीचे हे ट्विट आणि यावर तिची भूमिका पाहता आतातरी तिच्यावरील रोष शमणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.