'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल

बस्स.... मग काय

Updated: Feb 27, 2020, 02:58 PM IST
'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका आता अखेरच्या वळणावर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर कलाकारांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयल झाले. त्यात कोणी भावूक झालं तर, कोणाला अभिमानाची भावना आवरता आली नाही. 

अक्षरश: प्रत्येक पात्र जगलेल्या या कलाकार मंडळीपैकी एक असणाऱ्या येसूबाई यांची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रजक्ताचा लाठीकाठी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

'झी मराठी' वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचं पात्रंदेखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरत आहे. या पात्राशी खुद्द प्राजक्ताचंसुद्धा खास नातं जोडलं गेलं आहे. म्हणूनच की काय, मालिकेचं चित्रीकरण संपूनही कलाकार या पात्रांपासून स्वत:ला वेगळं करु शकलेले नाहीत. 

मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात याचाच प्रत्यय आला. ज्यावेळी लाठीकाठीचे खेळ पाहून ती स्वत:ला रोखू शकली नाही. तिच्यातील 'येसूबाई' पुन्हा जाग्या झाल्या. बस्स.... मग काय, पदर खोचून प्राजक्ताने अतिशय उत्साहात या पारंपरिक साहसी खेळाचं प्रदर्शन केलं. प्राजक्ताचा हा अंदाज साऱ्यांनीच मालिकेमध्ये पाहिला आहे. पण, प्रत्यक्ष तिला या मर्दानी खेळाचं प्रदर्शन करणाताना पाहून उपस्थितांनीही तिला दाद दिली. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेसाठी प्राजक्ताने बरीच मेहनत घेतली होती. एक धाडसी आणि महत्त्वांकाक्षी ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी तिने घोडेस्वारी लाठीकाठी आणि तालवारबाजीचंही प्रशिक्षण घेतलं होतं. लाठी ही प्रत्येक महिलेनं शिकावी असं आव्हानसुद्धा प्राजक्तानं केलं. फक्त साहसी खेळ म्हणून नव्हे, तर स्वसंरक्षणाचं एक तंत्र म्हणून याकडे पाहण्याचा सूर तिने आळवला.