मुंबई : जम्मू- काश्मीर आणि विशेष म्हणजे काश्मीर हे ज्याप्रमाणे पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचं ठिकाण आहे, त्याप्रमाणे कलाविश्वाच्या आणि कलाकारांच्याही ते मनाच्या अगदी जवळचं. जिव्हाळ्याचा विषय वगैरे.... म्हटलं तरीह काहीच हरकत नाही. पण, सध्याच्या घडीला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून समजल्या जाणाऱ्या काश्मीरला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी राज्यसभेत काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या अनुच्छेद ३७० रद्द करण्याचं विधेयक मंजुर झालं आणि त्याचे पडसाद विविध क्षेत्रांवर उमटल्याचं पाहायला मिळालं. कलाविश्वावरही याचे थेट परिणाम झाले. 


येत्या काळाता काही चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी बॉलिवूडमधील बरीच कलाकार मंडळी काश्मीरच्या दिशेने रवाना होणार होती. सारे बेतही आखले गेले होते. पण, सद्यस्थिती पाहता त्यांनी आखलेले बेत तूर्तास रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'शेरशाह' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कास्मीरच्या खोऱ्याच्या दिशेने काही दिवसांमध्येच रवाना होणार होता. करण जोहरच्या निर्मितीत साकारल्या जाणाऱ्या, संदीप श्रीवास्तवची पटकथा असणाऱ्या आणि विष्णू वर्धनच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकात आता काही बदल करण्यात आल्याचं कळत आहे. 


संजय दत्त, मकरंद देशपांडे आणि आलिया भट्ट यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'सडक २', या चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या भागाचं चित्रीकरणही काश्मीरमध्ये केलं जाणं अपेक्षित होतं. पण, सध्याच्या घडीला त्यावही गदा आल्याचं चित्र आहे.


फक्त हिंदीच नव्हे तर, दाक्षिणात्य चित्रपटांचं चित्रीकरणही याच भागांत केलं जाणं अपेक्षित होतं. पण, तणावग्रस्त वाचतावरण पाहता आणि कलाकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ल्क्षात घेत बऱ्याच चित्रपटांच्या वेळापत्रकांत महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 


हे चित्र कायम राहिल्यास काश्मीरमधील एक असा वर्ग ज्याला चित्रपटांच्या चित्रीकरणामुळे काही लहानमोठी कामं करत अर्थार्जनाची संधी मिळते त्यांच्यापुढे मोटा पेच उभा राहणार आहे. त्यामुळे परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशीच आशा व्यक्त केली जात आहे. 


काश्मीरवर चित्रपट निर्माते- दिग्दर्शकांचं विशेष प्रेम... 


हल्लीच्या दिवसांमध्येच नव्हे, तर अनेक दशकांपूर्वीच्या चित्रपटांमध्येही काश्मीरच्या खोऱ्याचं सौंदर्य पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. 'काश्मीर की कली'पासून ते अगदी 'जंगली'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये काश्मीरचं सुरेख रुप कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तर, हल्लीच्याच दिवसांमधील 'बजरंगी भाईजान', 'जब तक है जान', 'फितूर', 'हैदर', 'ट्युबलाईट', 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक', 'कलंक' या चित्रपटांतील बऱ्याच आणि तितक्याच महत्त्वाच्या दृश्यांचं चित्रीकरणही काश्मीरमध्येच करण्यात आलं आहे.