मुंबई : हिंदी आणि दाक्षिणात्य कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या आणि दमदार अंदाजाच्या बळावर अभिनेते रजनीकांत यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार रजनीकांत सध्या एका अध्यात्मिक दौऱ्यावर आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीसुद्धा ते उत्तराखंड दौऱ्यावर गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथल्या वातावरणाची थलैवावरही वेगळीच जादू आहे, असं म्हणायला हरकत नाही. रविवारी रात्रीच ते ऋषीकेश येथे दाखल झाले. यावेळी मुलगी ऐश्वर्याही त्यांच्यासोबत होती. दयानंद आश्रम येथे वास्तव्यास राहिल्यानंतर त्यांनी येथे गंगा आरतीही केली. ज्यानंतर गुरुंच्या समाधीस्थळी जात त्यांनी श्रद्धासुमनं अर्पण केली. पुढे काही वेळासाठी त्यांनीही ध्यानधारणा केली. 


दयानंद आश्रम हा गंगेच्या किनारी स्थिरावला आहे. जेथे संस्कृत आणि वेदांचं शिक्षण दिलं जातं. या ठिकाणी शंकराचं एक मंदिरही आहे. साठच्या दशकामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी या आश्रमाची सुरुवात केली होती. आश्रमाशी संलग्न व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत येथे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा इथेच एका खोलीत राहून ते आश्रमातच देण्यात येणारं भोजनही ग्रहण करतात. येथे होणारे कार्यक्रम, विविध उपक्रम याच्याविषयी जाणून घेण्यासाठीसुद्धा ते अतिशय उत्सुक असतात. 


आश्रमात काही काळ थांबल्यानंतर मुलीसह ते केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम येथे दर्शनासाठी गेले. मंदिर प्रशासनाकडून त्यांचं स्वागतही करण्यात आलं. आगामी चित्रपटासाठी आपण गुरु आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत, असं खुद्द रजनीकांत माध्यमांशी संवाद साधतना म्हणाले. 'दरबार, या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या चित्रपटाच्या यशासाठीच मी येथे आलो आहे' असं ते म्हणाले.