सेलिब्रिटींची हाक, चला लॉकडाऊन करुया घरगुती हिंसाचाराला...
हा व्हिडिओ पाहाच....
मुंबई : Coronavirusच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून लॉ़कडाऊन पाळण्यात येत आहे. पण, या परिस्थितीमध्ये प्रशासकीय यंत्रणांपुढे आणखी एक आवाहन उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे. हे आवाहन म्हणजे, घरगुती हिंसाचाराच्या वाढत्या प्रमाणाचं.
देशव्यापी लॉकडाऊन सुरु असताना याच काळात घरगुती हिंसाचाराच्याही घटनांचं प्रमाण वाढलं आहे. हीच बाब लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी म्हणून काही सेलिब्रिटींनी पुढाकार घेत हे सर्व प्रकार थांबवले जाण्यासाठी म्हणून सर्वांनाच एक मोलाचा संदेश दिला आहे. माधुरी दीक्षित, सोनाली कुलकर्णी, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांनी अतिशय कळकळीने घरगुती हिंसाचार थांबवण्यासाठी त्याविषयीची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचवण्याची विनंती सर्वांनाच केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचे, कौटुंबीक अत्याचारांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सगळ्या पुरुषांना आवाहन आहे, कौटुंबीक हिंसाचार थांबवा आणि त्याच्याविरोधात उभे राहा. स्त्रियांनाही आवाहन आहे, मौन सोडा शेअर करा. आपल्या घरात घरगुती हिंसाचार होत असेल तर रिपोर्ट करा, शेजारच्या घरात हिंसाचार होत असेल रिपोर्ट करा. तुम्ही स्वत: घरगुती- कौटुंबीक हिंसाचारामुळे त्रस्त असाल रिपोर्ट करा.... असं म्हणत चला घरगुती हिंसेवर लॉकडाऊन करुया असा निर्धार या अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओतून व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या सहकार्यातून येत्या काळात फक्त कोरोनावरच मात करायची नाही, तर हिंसाचाराच्या वृत्तीचाही नायनाट करायचा आहे हाच संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे.