मुंबई : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर शरबरी दत्ता sharbari dutta यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं आहे. कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी त्या मृत अवस्थेत आढळून आल्या. बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह आढळल्यामुळं अनेकांना धक्काच बसत आहे. मुळात दत्ता यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता येथील ब्रॉड स्ट्रीट येथील निवासस्थानी दत्ता एकट्याच राहत होत्या. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पुढं मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. ज्याच्या अहवालातूनच दत्ता यांच्या निधनाचं मुख्य कारण समोर येणार आहे. 


'पीटीआय'च्या वृत्तानुसार, दत्ता यांचे कुटुंबीय सकाळपासूनच त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्यांचा संपर्क मात्र होऊ शकला नाही. ज्यानंतर थेट दत्ता यांच्या निधनाचंच वृत्त हाती आलं. शरबरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. 




परमा बॅनर्जी, उज्जयनी मुखर्जी, श्रबोंती चॅटर्जी, रुक्मिमी मोइत्रा, पुजारिन घोष यांच्यासह देवेश चॅटर्जी या आणि अशा इतरही सेलिब्रिटींनी शरबरी दत्ता यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. 


 


शरबरी दत्ता या सुप्रसिद्ध बंगाली कवी अजित दत्ता यांच्या कन्या. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. डिझायनर पंजाबी कुर्ता आणि पुरुषांसाठी रंगीत बंगाली धोतराचा ट्रेंड पहिल्यांदा शरबरी यांनीच फॅशन जगतात आणल्याचं म्हटलं जातं. पुरुषांसाठीच्या एथनिक वेअर प्रकारच्या डिझाइन्ससाठी त्यांची वेगळी ओळख होती. शरबरी यांचा मुलगा अमलीन दत्ता हासुद्धा एक फॅशन डिझायनर आहे.