बॉलिवूडच्या `कॅलेंडर`ची चला हवा येऊ द्यामध्ये एन्ट्री
काय आहे निमित्त
मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या शोने आपली लोकप्रियता सातासमुद्रापार पोहोचवली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांनी देखील आवर्जून उपस्थिती लावली आहे. अनेक बॉलिवूडचे सिनेमे घेऊन कलाकार, दिग्दर्शक प्रमोशनकरता "चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येतात. शाहरूख खान, सलमान खान, सोनम कपूर, माधुरी दीक्षित यासारख्या मंडळींनंतर बॉलिवूडला खळखळून हसवणारा अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक देखील येत आहे.
'कॅलेंडर' म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो अभिनेता सतीश कौशिक यांचा 'मिस्टर इंडिया'तील तो सीन. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा अभिनेता आता 'चला हवा...' च्या मंचावर दिसणार आहे. 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी सतीश कौशिक आपल्याला या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. यावेळी भारत गणेशपुरे यांनी सतीश कौशिक यांची 'कॅलेंडर' ही भूमिका साकारली. बॉलिवूडमधील गाजलेला "मिस्टर इंडिया' हा सिनेमा आणि त्यामधील 'कॅलेंडर' हे साऱ्यांचच अतिशय लोकप्रिय कॅरेक्टर.
तसेच सतीश कौशिक यांची दिवाना मस्ताना या सिनेमातील 'पप्पू पेजर' ही भूमिका देखील गाजली होती. 1990 मधील 'राम लखन' सिनेमाकरता फिल्मफेअरचा 'बेस्ट कॉमेडिअन अवॉर्ड' त्यांना मिळाला.