मुंबई:  कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून आलेल्या  #MeToo या चळवळीचं वादळ आता जास्तच सक्रिय झाल्याचं कळत आहे. बऱ्याच दिग्गजांवर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर आता त्यापुढील कारवाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला 'क्वीन' फेम दिग्दर्शक विकास बहल याला 'इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डिरेक्टर्स असोसिएशन' (आयएफटीडीए / IFTDA)  यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 


'फँटम फिल्म्स'मध्येच काम करणाऱ्या एका महिलेने विकासवर आपल्याशी गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. ज्यानंतर या प्रकरणाने डोकं वर काढलं होतं. 


आपल्याला पाठवण्यात आलेल्या या नोटीसनंतर आता विकासने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 


'नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळून लावतो', असं म्हणत ते सर्व आरोप हे फक्त खोटेच नसून ते आधारहीनही असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 


'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसर विकास म्हणाला, 'माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेतच. पण, इथे लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे आजवर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली माझ्याविरोधात कोणती पोलीस तक्रार वगैरे दाखल करण्यात आलेली नाही. त्याशिवाय मला कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठीही बोलवण्यात आलेलं नाही. त्यामुळे आरोप सिद्ध होईपर्यंत मी निर्दोषच आहे', असं तो म्हणाला. 


दरम्यान, यापूर्वी विकासने विक्रमादित्य मोटवाने, अनुराग कश्यप यांच्याविरोधात विकासने आपली प्रतिमा मलिन करण्याचा आरोप करत अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. 


विकासची एकंदर भूमिका पाहता आता या प्रकरणाला आणखी कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.