Vivek Agnihotri on Bollywood : 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॉलीवूडवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मध्यंतरी विवेक हे ट्विटरवर सक्रिय नव्हते. आपण काही काळ ट्विटरपासून दूर असू असे विवेक यांनी ट्विट प्रसिद्ध केले होते. परंतु आता ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा एकदा बॉलीवूडविरूद्ध घणानाद सोडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बॉलीवूड्स इनसाईड स्टोरी' या नावाने त्यांनी एक नोट ट्विटरवर पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी बॉलीवूडच्या काळ्या चेहऱ्याचा पर्दाफाश केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. आपल्या लांबलचक नोटमध्ये त्यांनी लिहिले शब्द वाचून तुम्हाला राग आल्याशिवाय राहणार नाही. 


विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे की, ''बॉलिवुडमध्ये कसे काम चालते याची तुम्हाला कल्पना नाही. मी हे समजून घेण्यासाठी माझा बराच काळ या क्षेत्रात घालवला आहे. तुमच्यासमोर जे बॉलीवूड दिसतंय ते खरं बॉलीवूड नाही. बॉलीवूडचा काळा चेहरा इतका कल्पनेपलीकडे आहे की तुम्हाला अंदाजही येणार नाही.''


ते पुढे म्हणाले, ''या अंधारलेल्या बॉलीवूडच्या गल्लांमध्ये तुम्हाला तुटलेली, विस्कटलेली आणि गाडलेली स्वप्ने दिसतील. जर बॉलीवूड एक टेलेंटचं संग्रहालय आहे तर हेच बॉलीवूड टेलेंटचं स्मशानही आहे हे नाकारून चालणार नाही. येथे अपमान आणि शोषण होते. येथे स्वप्ने, आशा आणि विश्वास या गोष्टीही नष्ट होतात.''


''व्यक्ती अन्नाशिवाय जगू शकतो परंतु आदर, आत्ममूल्य आणि आशा यांशिवाय जगणे अशक्य आहे. कोणताही मध्यमवर्गीय तरुण स्वतःला त्याजागी बघणार नाही. इथे परिस्थिती अशी आहे की येथे येणारा कोणीही लढण्याऐवजी आधीच हार मानतो. नशीबवान ते आहे जे घरी जातात. बॉलीवूडमध्ये ज्यांना यश मिळते; जे यशही खरे नसते ते ड्रग्ज, दारू आणि सर्व चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतत जातात. त्यांना फक्त गरज असते ती पैशांची.''


''पैशाची कमतरता त्यांना काहीही करायला भाग पाडते. हे यश इतके खतरनाक असते की येथे सतत, क्षणाक्षणाला तुम्हाला सुपरस्टारसारखे दिसावे लागते. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स मोफत उपलब्ध नसतात, एक स्टार म्हणून तुम्हाला त्याचे पैसे मोजावे लागतात. शूटसाठी पैसे लागतात, छान दिसण्यासाठी पैसे लागतात.''


''ही एक डोळे बंद करून चालणारी लढाई आहे येथे तुम्हाला त्यापद्धतीनेच जगावे लागते. त्यात तुम्ही अधिकच खेचत जाता. शेवटी तुम्ही इतके एकटे पडता की तुम्हाला ना कोणी जवळ घेतं, ना कोणी तुमची पर्वा करतं. तुमच्या आजूबाजूचे लोकं फक्त तुमच्यावर हसत असतात.''


''बॉलीवूड हे एक असे ठिकाण आहे जिथे तुमची स्वप्नं जळतात, तुमच्या जवळची लोकंही तुमच्यावर हसतात आणि तुमचे अपयश साजरे करतात.''



तेव्हा विवेक अग्निहोत्रींच्या या पोस्टने सगळीकडे वादाची ठिणगी पेटली आहे. सध्या बॉलीवूडला चहू बाजूंनी टिका आणि विरोध होतो आहे तेव्हा आता खऱ्या अर्थाने बॉलीवूडचे भवितव्य धोक्यात आले आहे.