मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) कायमच चर्चेत असते. कंगना चर्चेत असण्याला एक लहानसं कारणंही पुरेसं होतं. यावेळी बॉलिवूडची ही क्वीन चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या रोमँटीक अंदाजामुळे आणि एका खास व्यक्तीमुळे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एंट्री झाली असून, त्या व्यक्तीचा हात हातात घेत ही अभिनेत्री अगदी खुलेपणानं प्रेमाची ग्वाही देत आहे. य़ा दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.


सर्वांसमक्ष कंगना कोणावरील प्रेमाची ग्वाही देतेय हा प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर, हे सारं काही खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडत नसून, कंगनाचं हे नातं एका चित्रपटाच्या निमित्तानं खुललं आहे.


थलैवी (Thalaivii) असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटातून ती दिवंगत अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या राजकारणात कमाल प्रतिष्ठा असणाऱ्या जयललिता यांच्या भूमिकेत झळकणार आहे.


कंगनाच्या या चित्रपटातील गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'तेरी आँखों में' (Teri Aankhon Mein) असे या गाण्याचे बोल असून, यामध्ये गतकाळातील प्रेमी युगुलांची झलक पाहायला मिळत आहे. जयललिता आणि एमजीआर यांच्या नात्याची एक बाजूही या गाण्याच्या निमित्तानं पाहायला मिळते.



कंगना आणि अरविंद स्वामी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये कंगनानं स्वत:मध्ये बरेच बदल केले आहेत. या भूमिकेचं गांभीर्य लक्षात घेता तिनं बराच अभ्यासही केल्याचं पाहायला मिळालं होतं. लवकरच कंगनाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यानिमित्तानं तिची आणखी एक भूमिका चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.