उर्दू कवी आणि लेखक मुनव्वर राणा यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणा यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना हे शायरी आणि उर्दूचं मोठं नुकसान असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणा यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावल्यानंतर खांदाही दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"या क्षेत्रात एकामागून एक होणारे मृत्यू होत असून, त्याची भरपाई होऊ शकणार नाही.  त्यांची उणीव कायम भासणार आहे. त्यांची शायरी प्रेरणादायी आहे, त्यांची लेखनशैली वेगळ्या अंदाजाची होती. चांगली शायरी करणं अवघड आहे पण स्वतःची शायरी लिहिणं त्याहूनही कठीण आहे," असं जावेद अख्तर म्हणाले आहेत. 


समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव मुनव्वर राणा यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले की, "मुनव्वर राणा देशातील एक मोठे शायर होते. अनेक वेळा स्पष्ट बोलणारे शायर फार कमी असतात. देव त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची हिमत देवो अशी प्रार्थना".


वयाच्या 71 व्या वर्षी निधन


मुनव्वर राणा यांचे रविवारी रात्री वयाच्या 71 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या राणा यांना संजय गांधी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी त्यांच्यावर लखनौमधील ऐशबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. मुनव्वर राणा हे उर्दू साहित्यातील मोठे नाव होते. 26 नोव्हेंबर 1952 रोजी रायबरेली येथे जन्मलेल्या राणा यांना 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुनव्वर राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला त्यांनी उर्दू साहित्य आणि शायरीत भरीव योगदान दिलं असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, "श्री मुनव्वर राणाजी यांच्या निधनाच्या वृत्ताने दु:ख झालं. त्यांनी उर्दू साहित्य आणि कवितेत समृद्ध योगदान दिलं. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासह आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.