मुंबई : अभिनेता आयुष्मान खुराना हा त्याच्या 'बाला' या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यामी गौतम, भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिकांमुळे 'बाला'ला चार चाँद लागले. दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि त्यावर तितकंच प्रभावी भाष्य करत या अफलातून चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटीहून जास्त रुपयांची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर आणले. या चित्रपटाने १०.१५ कोटी रुपये इतकी कमाई केली. पहिल्या दिवशी दमदार कमाई करणारा आयुष्मानचा हा सर्वोत्तम चित्रपट ठरत आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या, 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.०५ कोटी इतकी कमाई केली होती. 



आणखी एका ट्विटमध्ये आदर्श यांनी एक अभिनेता म्हणून आयुष्मान कशा प्रकारे कलाविश्वात यशस्वी वाटचाल करत आहे, हे काही चित्रपटांचे आकडे मांडून स्पष्ट केलं. ज्यामध्ये 'बाला', 'ड्रीम गर्ल', 'बधाई हो', 'आर्टीकल १५' अशा चित्रपटांचा समावेश होता. 



एकिकडे आयुष्मानच्या चित्रपटांचे विषय पाहता, 'बाला'तूनही असाच एक विषय हाताळला गेल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन तारुण्यात टक्कल पडत असणाऱ्या एका व्यक्तीला कशा प्रकारे काही अडचणींचा सामना करावा लागतो, त्याच्या मनात यावेळी नेमक्या कोणत्या भावना असतात यावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाला एकंदर मिळणारा प्रतिसाद पाहता खऱ्या अर्थाने याच 'बाला'चाच बोल'बाला' आहे, असं म्हणायला हरकत नाही.