मुंबई : घराणेशाहीचा मुद्दा असो किंवा मग आपल्याला चित्रपटविश्वातून अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला असल्याचं म्हणण्याचा विषय असो अभिनेत्री कंगना रानौतचं प्रत्येक वक्तव्य हे एका नव्या विषयाला, वादाला तोंड फोडून जातं. सध्याही बी- टाऊनमध्ये कंगना विरुद्ध काही सेलिब्रिटी असा एक गट तयार झाला आहे. पण या साऱ्यावर दिग्गजांनी मात्र बोलणं टाळलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना आणि तिच्या बहिणीनीने म्हणजेच रंगोली हिने काही दिवसांपूर्वी आलिया भट्टच्या अभिनय कौशल्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. शिवाय राजकीय घडामोडींवर आपली प्रतिक्रिया न देण्याच्या मुद्द्यावरुनही तिच्यावर कंगनाने निशाणा साधला होता. याचविषयी आणि कंगनाच्या बहिणीने आलियावर केलेल्या आरोपांविषयी विचारलं असता महेश भट्ट यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला. 'वो बच्चे है...', असं म्हणत त्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.  'ती (कंगना) लहान मुलगी आहे. तिने तिचा प्रवासही आमच्यासोबत सुरु केला आहे. आता फक्त तिचे कुणी नातेवाईक (बहीण रंगोली) माझ्याविषयी काही बोलत आहेत, तर मला यावर काही बोलायचच नाही. आमच्यावर जे संस्कार झाले आहेत ते आम्हाला हेच शिकवतात की, आपल्या मुलांवर कधीचट रागवू नये, त्यांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित करु नये. त्यामुळे आपल्या या मुलांविषयी मी काहीच बोलणार नाही, ते शक्यही नाही. माझे संस्कार मला असं करण्यापासून रोखतात', असं महेश भट्ट म्हणाले. 


अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपल्या या मुलांविषयी किंवा त्यांच्या विरोधात काहीच बोलणार नसल्याच्याच मुद्द्यावर महेश भट्ट ठाम राहिल्याचं पाहायला मिळालं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 'युअर्स ट्रुली' चित्रपटाच्या खास प्रदर्शनाच्या वेळी ते बोलत होते. 


काही दिवसांपूर्वी कंगनाच्या बहिणीने भट्ट आणि त्यांची पत्नी सोनी राजदान यांच्यावर टीका केली होती. शिवाय तिने आलिया आणि तिची आई भारतीय नागरिक नसल्याचंही म्हटलं होतं. आपल्या कुटुंबातील सदस्यांविषयी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात मात्र भट्ट यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.