मुंबई : अभिनेता रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘गली बॉय’, या चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वलचीही तयारी सुरु झाल्याचं म्हटलं जात होतं. दिग्दर्शिका झोया अख्तर हिने आता या माहितीला दुजोरा देत चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू असण्यावर शिक्काबोर्तब केलं आहे. ‘डेक्कन क्रोनिकल’ला दिलेल्या माहितीत तिने ‘गली बॉय’च्या सिक्वलविषयी वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या गल्ली बोळात, विशेषत: धारावीसारख्या भागात राहणाऱ्या एका तरुण आणि होतकरु वर्गाची कथा या चित्रपटातून झोयाने मांडली. रॅप या प्रकारातील संगीत नेमकं काय असतं आणि जागतिक पातळीवर त्याची लोकप्रियता नेमकी किती आहे, यावर चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. डिवाईन आणि नॅझी या दोन रॅपर्सच्या आयुष्याची कथा गली बॉयच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि मग प्रत्येकजण म्हणू लागला अपना टाईम आएगा...!


‘गली बॉय’ या चित्रपटाची लोकप्रियता आणि अशा कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याच्या उद्देशानेच आणखी पावलं उचलली जाणार असल्याचंच झोयाने स्पष्ट केलं. ‘माझी सहलेखिका रिमा कागती आणि मलाही असं वाटतं की आपल्या देशातील हिप- हॉप या संस्कृतीविषयी, कलेविषयी फार काही लिहिलं बोललं गेलं पाहिजे. त्यामुळे याच धर्तीवर आधारित आणखी एक चित्रपट लिहिला जात असून, त्याच्या कथानकावर काम सुरू आहे’, असं झोया म्हणाली. 


बम्बईया हिंदी भाषा, मुंबईतील एका अशा वर्गाची जीवनशैली ज्यांच्याकडे, ज्यांच्या कलागुणांकडे दुर्लक्ष होतं अशा कथा आणि अनुभव एकत्र बांधत झोयाने गली बॉय साकारला होता. आलिया भट्ट, रणवीर सिंग यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांचीही दाद मिळवली होती. तेव्हा आता या सिक्वललाही प्रेक्षकांची पसंती मिळते का आणि झोयाची ‘मुराद’  पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.