मुंबई : बायोपिकच्या ट्रेंडला हिंदी कलाविश्वात मिळालेली लोकप्रियता पाहता बऱ्याच निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी या धाटणीचे चित्रपट साकारण्याला प्राधान्य दिलं. मुख्य म्हणजे बी- टाऊनच्या या प्रयोगशीलतेला बऱ्य़ाच प्रमाणात यशही मिळालं. असाच एक नवा आणि तितकाच महरत्त्वाकांक्षी बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्याची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'धडक' फेम अभिनेत्री जान्हवी कपूर हिची मुख्य भूमिका असणारा हा बायोपिक आहे, 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल'. या चित्रपटाशी संबंधित एकूण तीन फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या तिन्ही फोटोंमध्ये जान्हवी साकारत असणाऱ्या गुंजन सक्सेना या अधिकाऱ्यांच्या विविध रुपांमध्ये दिसत आहे. 


एक महत्त्वाकांक्षी स्त्री, वडिलांची लाडकी मुलगी आणि एक यशस्वी वैमानिक अशा तीन रुपांमध्ये ती दिसत आहे. चित्रपटाचे तिन्ही पोस्टर अतिशय कलात्मकपणे साकारण्याच आले आहेत, ज्या माध्यमातून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज लावता येत आहे. एक सत्य घटना आणि त्याभोवती फिरणारं एका महत्त्वाकांक्षी मुलीचं आयुष्य नेमकं आता एका धाग्यात कशा पद्धतीने गुंफण्यात येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 




वायुदलातील पहिल्या महिला वैमानिक असणाऱ्या गुंजन सक्सेना यांनी १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान, महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्यांच्या या साहसपूर्ण योगदानासाठी मानाच्या अशा शौर्य वीर पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. हीच शौर्यगाथा आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 



जान्हवीसोबतच या चित्रपटात आणखीही काही कलाकार झळकणार आहेत. ज्यांमध्ये रिवा अरोरा ही त्यांच्या बालपणीची भूमिका साकारत आहे. रिवाने 'मॉम' या चित्रपटात श्रीदेवींच्या मुलीची भूमिका साकारली होती. करण जोहरची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी हे गुंजन सक्सेना यांच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहेत. असा हा अतिशय महत्त्वाकांक्षी चित्रपट १३ मार्च २०२०ला गगनभरारी घेणार आहे.