मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि तिच्याभोवती असणाऱं वादाचं वलय हे तसं फार जुनं नातं. प्रत्येक वेळी एका नव्या वादाशी कंगनाचं नाव जोडलं जातं. त्यातच आता नव्याने भर पडली आहे ती म्हणजे आणखी एका वादाची. आगामी 'जजमेंटल है क्या' या चित्रपटातील गाणं प्रदर्शित करण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने कंगना, राजकुमार राव आणि चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांची उपस्थिती होती. त्याचवेळी कंगनाच्या विचित्र वागण्याचा प्रत्यय उपस्थित पत्रकारांना आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका पत्रकाराने कंगनाला प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच तिने त्याला 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या वेळच्या प्रसंगाची आठवण करुन देत वादाला तोंड फोडलं. आपल्या चित्रपटाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या पत्रकाराला 'तुम तो हमारे दुश्मन बन गए यार....बडे घटिया बाते लिख रेह हो', असं म्हणत कंगनाने धारेवर धरलं. 


तिचं जाहीरपणे हे असं वागणं पाहून संबंधित पत्रकाराला सुरुवातीला याचा अंदाज आला नाही. पण, त्याने लगेचच तिला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. शब्द वाढत गेले आणि अर्थातच वादाचं हे सत्र नव्या वळणावर आलं. कंगनाचं हे वागणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हणत त्या पत्रकाराने थेट शब्दांत तिची चूक निदर्शनास आणून दिली. 


कंगनाने केलेली सर्व वक्तव्य पूर्णपणे खोटी असल्याचं म्हणत या क्षणला ती पूर्णपणे चुकली असल्याचं त्या पत्रकाराने सांगितलं. यावेळी उपस्थित इतर पत्रकारांनाही या प्रसंगी धक्काच बसला. कार्यक्रमाच्या आयोजक आणि सूत्रसंचालकाने हा प्रसंग सावरुन नेण्याचा प्रयत्न केला खरा, पण पत्रकारांशी अशा प्रकारे वागणं चुकीचं असल्याचं म्हणत उपस्थित सर्वच पत्रकारांनी कंगनाच्या या वागण्याचा विरोध केला. 



प्रत्येक वेळी आपल्या सोयीने वागणाऱ्या कंगनाचा हा स्वभाव पाहता नेटकऱ्यांनीही तिच्यावर तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. तिच्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहता येत्या काळात कंगनाचं संकट वाढतं का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सहसा कलाकार मंडळी आणि माध्यमांमध्ये मैत्रीचं आणि तितकंच खेळीमेळीचं नातं असतं. पण, कंगनाचं वागणं पाहता बी टाऊनची ही क्वीन सर्वांच्याच लेखी ड्रामा क्वीन तर होऊन राहत नाही ना? हाच प्रश्न वारंवार सर्वांच्याच मनात घर करत आहे.