मुंबई :  दाक्षिणात्य चित्रपटांचा हिंदी चित्रपविश्वात होणारा रिमेक आणि त्यापुढे चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता ही सारी समीकरणं आता काही नवी नाहीत. अशाच समीकरणांमध्ये आता आणखी एका चित्रपटाचं नाव नव्याने जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचं. या चित्रपटाच्याच धर्तीवर त्याचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कबीर सिंग' असं या चित्रपटाचं नाव आहे. ज्यामध्ये अभिनेता शाहिद कपूर या मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहे. प्रेमभंग, दुरावा आणि त्यानंतर कबीरमध्ये होणारे बदल, त्याच्यावर होणारे परिणाम, खरंतर दुष्परिणाम या साऱ्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. 'कबीर सिंग'मध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करत आहे. त्यामुळे कियारा आणि शाहिदची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 


चित्रपटाच्या ट्रेलरच्या अगदी सुरुवातीलाच वासनाधीन 'कबीर सिंग' नजरेस पडतो. पुढे रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या रुपात तो दिसतो तर, बऱ्याच दृश्यांमध्ये तो एका व्यसनाधीन व्यक्तीच्या रुपात दिसतो. दारु आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेला कबीर हा त्याच्याच आयुष्याची राखरांगोळी करत असतो. त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मित्रमंडळी प्रयत्न करतात. पण, कबीर कोणाचंही ऐकण्याच्या पलीकडेच गेलेला असतो. 



प्रीती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलेला कबीर हा त्याच्या या नात्याकडे बराच गांभीर्याने पाहात असतो. पण, गणितं नेमकी चुकतात आणि या नात्यासह प्रिती, कबीरच्या बदललेल्या आयुष्यात पुढए नेमकं काय होतं याचंच चित्रण चित्रपटातून करण्यात आलं आहे. ट्रेलरमधून 'कबीर सिंग' हे नेमकं काय प्रकरण आहे, याची प्रभावी झलक पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. मुख्य म्हणजे पुन्हा एकदा शाहिदच्या अभिनयाची झलकही अनेकांच्याच नजरा खिळवून ठेवत आहे. त्यामुळे संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित 'कबीर सिंग' आणि त्याचं हे रुप बॉक्स ऑफिसवर गाजणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.