मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतरच्या काही वर्षांमध्येच अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली होती. उडता पंजाब, हायवे आणि राझी अशा चित्रपटांतून तिच्या अभिनयकौशल्याची झलकही प्रेक्षकांना पाहता आली. आलिया सध्या गाजतेय ते म्हणजे 'कलंक' या तिच्या आगामी चित्रपटामुळे. 'कलंक'मधील तिचा लूक आणि एकंदर अंदाज पाहता नजाकत या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजेच आलिया साकारत असलेली 'रुप' ही भूमिका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहरच्या या स्वप्नवत प्रोजेक्टमध्ये रुपची भूमिका साकारण्यासाठी आलियाने बरीच मेहनत घेतली आहे. मग ती भाषेवरील असो किंवा देहबोलीमध्ये आणलेल्या काही बदलांच्या बाबतीत असो. या भूमिकेच्या निमित्ताने ती एका पाकिस्तानी अभिनेत्रीशीही जोडली गेली. ती अभिनेत्री म्हणजे, 'जिंदगी गुलजार है' फेम, सनम सईद. 'मुघल-ए-आझम', 'उमराव जान' असे चित्रपट पाहणाऱ्या आलियाने उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार 'जिंदगी गुलजार है', ही मालिका पाहत त्यात समन सईदने साकारलेली 'कशफ मुर्तझा'ची भूमिका अगदी जवळून पारखली. अभिनेता फवाद खानही या मालिकेमुळे प्रकाशझोतात आला होता. त्याने या मालिकेत 'झारुन जुनैद' ही भूमिका साकारली होती. 



'कशफ' आणि 'कलंक'मधील आलिया साकारत असलेली 'रुप' या दोन्ही व्यक्तीरेखा एकमेकांशी अनेक अंशी मिळत्या-जुळत्या आहेत. त्यांच्या वागण्याचे अनेक पदर आहेत, हेच आलियाने 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'कलंक'च्या निमित्ताने आलिया अनेक कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करत आहे. मुळात ही एक उत्तम संधी असल्याचंही तिने स्पष्ट केलं. त्यामुळे आता कशफची साथ घेत आलियाने साकारलेली रुप प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते का, याकडे फक्त चित्रपट निर्माते- दिग्दर्शकांचच नव्हे तर खुद्द आलियाचंही लक्ष लागलं असणार हेच खरं.