सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक : अभिषेक वर्मन


निर्माते : धर्मा प्रोडक्शन, फॉक्स स्टार स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेन्ट 


संगीत दिग्दर्शन : प्रितम चक्रवर्ती, संचित बलहारा 


मुख्य भूमिका : आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित, कुणाल खेमू


प्रेमाची भावना एखाद्याच्या आयुष्यात कधी आणि कोणत्या रुपात तिची चाहूल देईल याचा काहीच अंदाज लावता येत नाही. हेच प्रेम कोणासाठी प्रेरणादायी ठरतं, कोणाच्या आयुष्यात कोणाचीतरी जागा घेतं आणि हेच प्रेम अखेरच्या टप्प्यावर येऊन कलंकही ठरतं. प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीतून बदलत जातो. मत्सर, सूड या भावनाही त्याचाच एक भाग होऊन जातात आणि मग सुरुवात होते एका धाग्यात बांधल्या गेलेल्या काही नात्यांची गुंतागुंत सोडवण्याची..... 'कलंक'ची. 


सोनाक्षी सिन्हा (सत्या) आणि आदित्य रॉय कपूर (देव चौधरी) यांनी साकारलेली एक प्रतिष्ठित कुटुंबातील घरंदाज जोडी आणि त्यांच्या नात्यात असणारं प्रेम चित्रपटात सुरेखपणे साकारण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे ऐन तारुण्यात असणाऱ्या आलियाचं (रुपचं) मुसलमान मुलावर (जफरवर) जडणारं प्रेम कथानकाला पुढे नेतं. आयुष्यात प्रेमासाठी आसुसलेली 'रुप' आणि एका सूडाच्या भावनेचा दाह सहन करणारा 'जफर' पहिल्यांदाच जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्या नजरेत असणारे भाव पाहण्याजोगे आहेत.  प्रेमाची साथ घेत चालणारं चित्रपटाचं कथानक अतिभव्य आणि दृष्टीक्षेपातच भारावणाऱ्या सेटवर फुलत जात. फुलत जातं म्हणण्यापेक्षा ही एक ठिणगी आहे जी हळूहळू धुमसत जाते असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. कारण व्यक्तीला घडवतं ते प्रेम आणि बिघडवतं तेही प्रेमच....  


एकिकडे 'जफर'- 'रुप'च्या प्रेमाचा रंग चढत असतानाच दुसरीकडे हिंदू- मुस्लिम वाद, भारत- पाकिस्तान फाळणी या गोष्टीही कथानकात सुरू राहतात. किंबहुना त्या कथानकाला गती देण्याचा प्रयत्नही करतात. पण, काही अंशी अपयशी ठरतात. चित्रपटाचा पूर्वार्ध हा काहीसा लांबलेला वाटतो. तर उत्तरार्धापर्यंत प्रेक्षकांना पुढे काय होणार याचा सहज अंदाज येऊ लागतो. 'नाजायज मोहोब्बत का अंजाम अक्सर तबाही होता है....', 'मेरे पास खोने को कुछ है ही नही', 'कुछ रिश्ते कर्जों की तरह होते उन्हे निभाना नही चुकाना पडता है' हे संवाद चित्रपटाचा  ट्रेलर आणि टीझरमधून प्रेक्षकांची मनं जिंकून गेले होते पण, तेच संवाद वगळले तर चित्रपटात दमदार संवादांचीही कमतरता जाणवते. 


'कलंक'च्या निमित्ताने अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित ही जोडी पुन्हा रुपेरी पडद्यावर आली आहे. एकेकाळी प्रकाशझोतात आणि चर्चांच्या वर्तुळांमध्ये असणारी ही जोडी एकत्र झळकणार म्हणून जी उत्सुकता असते ती नेमकी कोणत्या निकाली निघते हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईलच. माधुरीने साकारलेली 'बहार बेगम' आणि संजय दत्तने साकारलेला 'बलराज चौधरी' काही दृश्य वगळता फार प्रभाव पाडत नाहीत. प्रभाव पाडत भलताच भाव खाऊन जातो तो म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर, काही अंशी वरुण धवन आणि हो, न विसरता उल्लेख करावा असा कुणाल खेमू.



नकारात्मक भूमिका साकारणारा कुणाल, त्याने साकारलेला 'अब्दुल' हा 'कलंक'च्या स्टारकास्टपैकीच एक. अर्थात त्याचं काम हे चित्रपट पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही, हेसुद्धा तितकच खरं. पार्श्वसंगीत, त्यातील गीतं आणि सेट या 'कलंक'च्या जमेच्या बाजू. अम्रिता महलच्या कलेतून करण्यात आलेली सेटची बांधणी आणि छायांकनाची सुरेख उदाहरणं चित्रपटात पाहायला मिळतात. पण, एकंदरच हे समीकरण जितचं प्रभावी असल्याची अपेक्षा करण्यात आली होती, तितका प्रभाव पाडण्यात मात्र काहीसे कमी पडतात. प्रेम म्हणजे नातं....., नातं म्हणजे अपेक्षा.... अपेक्षा म्हणजे पुन्हा प्रेम आणि याच साऱ्याचं समीकरण म्हणजे 'कलंक'. त्यामुळे काही खास कारणांसाठी, संजय- माधुरी या जोडीसाठी, भव्य सेट पाहण्यासाठी 'कलंक' एकदा पाहायला हरकत नाही. 


अडीच स्टार 


- सायली पाटील
(SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com)